सांगली : लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, आंदोलन सनदशीर मार्गानेच झाले पाहिजे. सनदशीर मार्ग सोडून जर आंदोलन होत असेल तर कारवाई करायला सरकार आहेच, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. शनिवारी सांगलीत मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठी मुंबईत होत असलेल्या आंदोलनाबाबत विचारले असता ते बोलत होते.

मंत्री पाटील सांगली जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मराठा आंदोलक जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत पुढील आठवड्यात आंदोलन करणार आहेत, याबाबत शासनाची भूमिका काय, असे विचारले असता ते म्हणाले, आतापर्यंत मराठा आरक्षण उपसमितीमधून खूप काही गोष्टी मराठा समाजाला मिळाल्या आहेत.

जरांगेंनी केलेल्या मागणीतून खूप गोष्टी साध्य झालेल्या आहेत. त्यामुळे आता जरांगे यांनी कागद, पेन घेऊन मराठा आरक्षणबाबत सरकारसमोर चर्चेला बसायला हवे. मात्र, सरकारशी चर्चा न करता मुंबईला जाणार, उपोषण करणार असे म्हणत असतील तर लोकशाही मध्ये प्रत्येकाला सनदशीर पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण सनदशीर मार्ग सोडून जर आंदोलन होत असेल तर सरकार कारवाई करायला बसलेच आहे.

मराठा आरक्षण समितीचा बराच वेळ मी अध्यक्ष होतो. एकाच माणसाने किती वेळ काम करायचे? त्यामुळे नव्या व्यक्तीकडे हे काम आले. या समितीकडून आतापर्यंत अनेक गोष्टी साध्य झालेत, यासाठी आठवड्यातून एकदा मंत्रिमंडळाची बैठक देखील व्हायची. यातून सारथी आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ देखील उभारले. अनेक जातीच्या दाखल्यांचे विषय देखील समोर येत आहेत.

सत्यअसत्यता तपासणीसाठी वेळ लागतो. त्याला कालावधी देण्यासाठी उपसमिती आवश्यक असते. जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांमध्ये अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत. कुणबी दाखले देण्यासाठी समिती नेमली. त्यानंतर कुणबी दाखले देण्यात आले. यातून लाखो लोकांना कुणबी दाखले मिळाले. परंतु, ज्यांची नोंदच नाही त्यांना कसे मिळणार? त्यामुळे दहा टक्के मराठा आरक्षण मिळाले.

आर्थिक मागास आरक्षण हे सर्वांत चांगले आरक्षण होते. त्यामुळे आर्थिक मागासांमधील जागा रिकाम्या जात आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी कागद पेन घेऊन समोर बसले पाहिजे. मुंबई जाणार, आंदोलन करणार, लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. लोकशाहीमध्ये सनदशीर मार्गाने आंदोलन करायला सर्वांना परवानगी आहे. सनदशीर मार्ग सोडला तर सरकार कारवाई करायला बसलेच आहे.