“परमेश्वराने ठाम भूमिका घेतल्यानेच करोना आणि पूर आला”, विश्वजित कदमांचं वक्तव्य

सांगलीत झालेल्या पूर परिषदेत बोलताना विश्वजित कदम यांनी केलेल्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

Minister Of State Vishwajeet Kadam Statement on Sangli Flood Corona gst 97
मंत्री विश्वजित कदम म्हणाले, "परमेश्वराने ठाम भूमिका घेत आपल्याला 'ही' शिक्षा दिली आहे" (Photo : File)

गेल्या वर्षभराहून अधिक काळ देशासह जगावर असलेलं करोना महामारीचं संकट आणि राज्यात दरवर्षी निर्माण होणारी पूरस्थिती या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी आता एक अजब तर्क लावल्याचं पाहायला मिळत आहे. विश्वजित कदम याबाबत बोलताना म्हणाले कि, “परमेश्वराने ठाम भूमिका घेतली म्हणूनच कोरोना आला आणि पूर आला. परिणामी आपल्याला घरात बसावं लागलं.” ते शनिवारी (२१ ऑगस्ट) सांगलीत पार पडलेल्या पूर परिषदेत बोलत होते. दरम्यान, विश्वजित कदम यांनी केलेल्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

सांगलीत झालेल्या पूर परिषदेत बोलताना विश्वजित कदम असं म्हणाले कि, “परमेश्वराने ठाम भूमिका घेत आपल्याला ही शिक्षा दिली आहे. कारण पिढ्यानपिढ्या आपण फक्त शोषण आणि प्रदूषणच केलं. अनेक खून, चोऱ्या झाल्या. त्यामुळे अखेर परमेश्वराने ठाम भूमिका घेतली आणि कोरोना आला. त्याने आपल्याला घरात बसवलं. त्यानंतर पूर आला. या सगळ्याचा जबरदस्त फटका आपल्या सर्वांनाच बसला आहे. पण आता यावर उपाययोजना करून या समस्या सोडवण्याच्या दिशेने पावलं टाकणं आवश्यक आहे.” दरम्यान, यावेळी मंचावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील देखील उपस्थित होते.

निसर्गाशी आपण फार मोठा खेळ केलाय!

जयंत पाटील यांनी देखील सांगलीत वारंवार निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर भाष्य केलं आहे. जयंत पाटील म्हणाले कि, “पूर येणे हा काही विषय राजकीय नाही. निसर्गाशी आपण फार मोठा खेळ केला आहे. माणसाकडून वारंवार अतिक्रमण करण्यात आलं आहे. त्यामुळे, निसर्गाने हे रूप धारण केलं आहे. सांगली शहरात बिबट्या, मगरी येऊ लागल्या आहेत. हा फार गंभीर प्रश्न आहे. मानवाच्या अनेक चुका झाल्या आहेत. त्याचे दूरगामी परिणाम सोसावे लागणार आहेत.”

…तर आपण काहीच करू शकत नाही!

पुढे बोलताना जयंत पाटील असंही म्हणाले कि, “एका निश्चित मर्यादेपेक्षा जास्त पाऊस पडला तर आपण काहीच करू शकत नाही. याचा अनुभव आम्हाला मागच्या वेळी धरणाच्या मागे पाऊस पडला त्यावेळी आला. त्यावेळी जिवंत जनावरं वाहून गेल्याचं पाहून डोळ्यात पाणी आलं होतं. आपण पडणारा पाऊस आणि धरणात येणार पाऊस याचा ताळमेळ लावू शकतो. पण यावेळी पडणाऱ्या पावसाचा ताळमेळ घालता आला नाही. म्हणूनच मी अनेकांना गावं सोडायला सांगितलं. त्यामुळे जीवितहानी झाली. प्रचंड पाऊस पडतो तेव्हा काहीच पर्याय नसतो. जेवढं पाणी खाली जाईल तेवढं चांगलं. आमचं कर्नाटक सरकारशी बोलणं झालं. त्यांनी देखील सहकार्य केलं.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Minister of state vishwajeet kadam statement on sangli flood corona gst