पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे. आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. या सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पूजाच्या मोबाइलमध्ये सापडलेल्या या संभाषणांमधील एक संभाषण ९० मिनिटं चाललं होतं अशी सूत्रांची माहिती आहे.
पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारीला पुण्यात इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. आत्महत्येसाठी शिवसेनेचे यवतमाळमधील आमदार संजय राठोड यांना जबाबदार धरलं जात असून यामुळे २८ फेब्रुवारीला त्यांना वनमंत्रीपदाचा राजीनामादेखील द्यावा लागला.
पूजा राठोड म्हणजेच पूजा चव्हाण?
“प्राथमिकदृष्ट्या फोनमधील संभाषणावरुन समोरील व्यक्ती संजय राठोडच असल्याचं दिसत आहे. तिने आपली सर्व संभाषणं रेकॉर्ड केली होती. हे संभाषण बंजारा भाषेत झालं असल्याने आम्ही भाषांतर करुन घेत आहोत,” अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. संजय राठोड आणि पूजा चव्हाण दोघेही एकाच आदिवासी बंजारा समाजातून होते. मूळची बीडची असणारी पूजा शिक्षणासाठी पुण्यात राहत होती. आत्महत्येनंतर तिच्यात आणि संजय राठोड यांच्यात संबंध असल्याचा आरोप झाला.
पूजा चव्हाण प्रकरण; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं मृत्यूचं कारण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाचा मोबाइल फोन ज्यामध्ये सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग आहे तो फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस मोबाइलमधील सर्व डेटा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच आत्महत्येच्या २४ तास आधीचं यवतमाळ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळवलं असून फॉरेन्सिकसाठी पाठवलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, फुटेजमध्ये पूजा राठोड ही संजय राठोड यांचा निकटवर्तीय अरुण राठोडसोबत दिसत आहे. अरुण आणि संजय राठोड यांचा अजून एक सहकारी विलास चव्हाण हे पूजासोबत पुण्यातील मोहम्मद वाडी येथील हेवन पार्कमध्ये एका भाड्याच्या घऱात राहत होते. तिथेच तिचा मृत्यू झाला.
पोलिसांना यवतमाळ मेडिकल कॉलेमजधून पूजाच्या फोन आणि सीसीटीव्ही फुटेजचा रिपोर्ट मिळाला आहे. मात्र अद्याप पोलिसांनी संजय राठोड यांच्या आवाजाचे सॅम्पल लॅबकडून मागवलेले नाहीत. दरम्यान इंडियन एक्स्प्रेसने संजय राऊत यांच्याकडे प्रतिक्रिया मागितली असता यास्थितीला काही बोलू शकत नाही असं सांगत त्यांनी नकार दिला.