करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सोबतच अनेक सेलिब्रिटीही करोनाविषयीची जनजागृती करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना घरात राहण्याचं आवाहनही करत आहेत. तसंच कलाकारांनी पंतप्रधान मदतनिधीच्या माध्यमातून आर्थिक मदतही केली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत कलाकारांचे आभार मानले आहेत.

‘प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे. तसंच प्रत्येकाने केलेली मदत सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. आपल्या कलाकारांनी मदतनिधीच्या माध्यमातून आर्थिक मदत केली तसंच जनतेला मदत करण्याचा आवाहनही केलं त्यामुळे मी कलाकारांचे आभार मानतो. खासकरुन माधुरी दीक्षित, भूमी पेडणेकर, आयुषमान खुराना,आलिया भट्ट, करण जोहर यांनी पंतप्रधान मदतनिधीच्या माध्यमातून जनतेला मदत करण्याचं आवाहन केल्यामुळे त्यांचे मनापासून आभार, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं.

मोदी यांनी या ट्विटसोबतच आणखी एक ट्विट केलं आहे. ‘देशातील कलाकार मंडळी जनतेला जागृत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका वठवत आहेत. जनजागृती करण्यासोबतच ते आर्थिक मदतही करत आहेत. त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार. अजय देवगण, कार्तिक आर्यन,शिल्पा शेट्टी आणि नाना पाटेकर तुमच्या साऱ्यांचे आभार’.

दरम्यान, आतापर्यंत अनेक कलाकारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान मदतनिधीच्या माध्यमातून आर्थिक मदत केली आहे. तर काही कलाकारांनी गरजू व्यक्तींना शिधा आणि पैसे देऊन मदत केल्याचं समोर आलं आहे.