शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये काही मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं आहे. तानाजी मालुसरे हे त्यापैकीच एक नाव आहे. जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचा उल्लेख येतो तिथे तिथे तानाजी मालुसरे हे नाव आपसुकच घेतलं जातं. अभिनेता अजय देवगण ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट घेऊन येतोय. गतवर्षी अजयने ट्विटरद्वारे चाहत्यांना याची माहिती दिल होती. या चित्रपटाची बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच यातील कलाकारांविषयी उत्सुकता निर्माण झाली. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या ऐतिहासिक चित्रपटामध्ये सलमान खान विशेष भूमिका करणार आहे. सलमान खान यामध्ये कोणती ऐतिहासिक भूमिका साकारणार याची अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र, सुत्रांच्या वृत्तानुसार सलमान खान शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये झळकणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी सैफ अली खान ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’मध्ये शिवाजी महाराजांची भूमिका करणार असे वृत्त आले होते. मात्र सैफ अली खानने नुकतेच मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत आपण शिवाजी महाराजांची भूमिका करणार नसल्याचे स्पष्टिकरण दिले. आपण ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा भाग आहे, मात्र यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिक वठवणार नसल्याची माहिती दिली होती. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’चे चित्रकरण पुर्ण केल्याची माहितीही सैफने दिली.

(आणखी वाचा : फक्त याच कारणासाठी अजय देवगणने स्वीकारला ‘तानाजी’)

सुत्रांच्या महितीनुसार, ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटामध्ये सैफ अली खान राजपूत योद्धा उदयभान राठौडच्या भूमिकेत दिसणार आहे. जो मुगल बादशाह औरंगाजेबच्या किल्याची सुरक्षा करत होता. याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. पण प्रेक्षकांना उत्सुकता आहे. शिवाजी महाराजांच्या भूमिका कोण साकारणार आहे. अजय देवगणने चित्रपटात कोणता अभिनेता कोणती भूमिका साकारणार याबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

१५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका काजोल साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच अजयने ‘तानाजी’चा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर शूटिंगलाही सुरुवात झाली. सैफ अली खानशिवाय अभिनेता अजिंक्य देव या चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. ही कोणती भूमिका असणार याबाबत अद्याप काही स्पष्ट झालं नाही.

ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराज आणि त्यांच्या निर्भीड मावळ्यांच्या पराक्रमांच्या गाथा जिवंत केल्या जाणार आहेत. सिंहगडाच्या संग्रामामध्ये तानाजी मालुसरे यांचं योगदान, कोंढाण्याच्या लढण्यासाठी त्यांनी कुटुंबावर ठेवलेलं तुळशीपत्र या सर्व गोष्टी पुन्हा एकदा चित्रपटाच्या रुपानं जाग्या केल्या जाणार आहेत. तेव्हा आता ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’, असं म्हणणाऱ्या एकनिष्ठ तानाजींची गाथा अनुभवण्यासाठी उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.