Birthday Special : पहिलं प्रेम ते १९ वर्षांनी लहान मान्यताशी लग्न; जाणून घ्या संजय दत्तविषयी खास गोष्टी

अभिनेता संजय दतच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात ‘खलनायक’ पासून ते ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ पर्यंत त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी…

Sanjay-Dutt-Birthday
(Photo: Express Archive)

बॉलिवूडचा ‘मुन्नाभाई’ संजय दत्त आज आपला वाढदिवस साजरा करतोय. मुंबईमध्ये २९ जुलै १९५९ रोजी त्याचा जन्म झाला. संजय दत्तचे पिता सुनिल दत्त हे त्यावेळचे बडे अभिनेते आणि आई नरगिस या अभिनेत्री होत्या. संजय दत्तला अभिनयाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाल्यामुळे तो अभिनयाकडे वळला आणि तो सुद्धा सुपरस्टार बनण्याचे स्वप्न पाहू लागला. अभिनेता संजय दत्तचं आजही त्या यादीत घेतलं जातं, ज्यात अभिनेते गेल्या ३ दशकांपासून आपल्या दमदार अभिनयाने आजपर्यंत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. ‘खलनायक’ पासून ते ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ पर्यंत संजय दत्तने कोट्यावधी चाहत्यांच्या मनात आपली खास जागा निर्माण केलीय. ‘संजू बाबा’ नावाने ओळखला जाणाऱ्या संजय दत्तने त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेत. त्याच्या आयुष्याची कहाणी एका चित्रपटापेक्षा जास्त रोमांचक आणि तितक्याच चढ-उतारांनी भरलेली आहे. मात्र या साऱ्या प्रसंगांना तो हिंमतीने सामोरं गेला. काही चढ-उतार प्रसंगी तो खचला देखील पण पुन्हा नव्याने उमेदीनं तो उभा राहिला आणि पुन्हा जोमाने कामाला लागला. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यातील काही चढ उतार….

 

पहिला चित्रपट रिलीज होण्याआधीच आईचं निधन

अभिनेत्री नर्गिस आणि अभिनेते सुनील दत्त यांचा मुलगा असलेल्या संजय दत्तने १९७२ मध्ये बालकलाकार म्हणून रेशमा और शेरा या चित्रपटातून काम केले. १९८१ मध्ये त्याची नायक म्हणून पहिली फिल्म आली. नर्गिस आपल्या मुलांवर अतोनात प्रेम करत होत्या. पण १९८० त्या कॅन्सरग्रस्त झाल्या. त्यांना आपला मुलगा संजय दत्तचा पहिला चित्रपट पाहायचा होता. पण त्या पाहू शकल्या नाहीत. संजय दत्तच्या ‘रॉकी’ या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमियरच्या केवळ ३ दिवस आधी ३ मे १९८१ ला नर्गिस यांच निधन झालं. त्यामुळे संजय दत्तला मोठ्या दुःखाचा सामना करावा लागला होता. डोक्यावरून आईचं छत्र हरपल्यानंतर तो एकटा पडू लागाला आणि याचदरम्यान तो चुकीच्या वळणावर जाऊ लागला. बॉलिवूडचं स्टारडम त्याच्या डोक्यात जाऊ लागलं आणि त्यात तो ड्रग्सच्या अधीन गेला.

sanjay-dutt-nargis-death
(Photo: Express Archive)

संजय दत्त बॉलिवूडमध्ये झाला सुपरहिट

संजय दत्त ने १९८१ मध्ये बॉक्स ऑफिसवर हिट झालेल्या ‘रॉकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरूवात केली. त्यानंतर त्याने १९८२ साली सुपरहिट झालेल्या ‘मैं आवारा हूं’ आणि १९८३ साली सगळ्यात जास्त कमाई करून दिलेल्या ‘विधाता’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवले. १९९० मध्ये ‘सडक’, ‘साजन’ आणि ‘खलनायक’ या चित्रपटातून संजय दत्तने त्याच्या यशाची घोडदौड सुरूच ठेवली. यासाठी त्याला फिल्मफेअर सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार कॅटेगरीसाठी नामांकन मिळालं होतं.

sanjay-dutt-sunil-dutt
(Photo: Express Archive)

ड्रग्जच्या अधीन गेला संजय दत्त

नर्गिसच्या मृत्यूनंतर संजय दत्तला ड्रग्ज घेतल्याबद्दल सुनील दत्तला कळलं, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. सुनील दत्तने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ते त्या दिवसांत इतके व्यस्त असायचे की त्याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हते. ते म्हणाले होते की, “मला संजयच्या या सवयीबद्दल कधीच कळले नाही. पण तो ड्रग्जच्या खूप व्यसनाधीन झाला होता. नंतर सुनील दत्त यांनी त्याला या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी अमेरिकेतील एका पुनर्वसन केंद्रात पाठवले. याच ठिकाणी जाऊन उपचार घेतल्यानंतर संजय पूर्णपणे बारा झाला आणि पुन्हा भारतात परत आला. परंतु, अजूनही त्याची मद्यपानाची सवय सुटलेली नाही. अनेकदा बऱ्याच पार्टीमध्ये तो मद्यधुंद अवस्थेत स्पॉट होत असतो.

ड्रग्सपासून सुटका झाल्यानंतर केलं लग्न, पण पुन्हा पडला एकटा

१९८७ साली संजय दत्तने रिचा शर्माशी लग्न केले होते. त्या दोघांनी मुलगी त्रिशाला हिला जन्म दिला. मात्र मुलीच्या जन्मानंतर रिचाला ब्रेन कॅन्सर झाला. रिचा तिच्या ब्रेन कॅन्सरच्या उपचारासाठी अमेरिकेत गेली होती. तर दुसरीकडे संजय आणि माधुरीच्या प्रेमकहाणीने जोर धरला होता. अशा परिस्थितीत जेव्हा रिचाला ही बातमी कळली तेव्हा ती वाईटरित्या तुटली. संजय माझ्या आयुष्यात परत यावा अशी तिची इच्छा होती. बरेच दिवस ते दोघे एकमेकांपासून दूर झाल्यामुळे त्यांच्यातील अंतर वाढलंय, असं तिचं मत होतं. दुसरीकडे माधुरी दीक्षितही त्याच्यापासून थोडा दुरावाच ठेवताना दिसून आली. काही काळाने संजय दत्तने रिचा शर्माला केवळ घटस्फोटच दिला नाही तर आपल्या मुलीला देखील एकटे सोडले. त्यानंतर पत्नी रिचा शर्माचं कॅन्सरमुळे निधन झालं आणि तो पुन्हा एकटा पडला.

sanjay-dutt-richa-sharma
(Photo: Express Archive)

दुसरं लग्न केलं, पण ते ही टिकलं नाही

त्यानंतर संजयने १९९८मध्ये मॉडेल रिया पिल्लेशी विवाह केला. मात्र तो फार काळ टिकला नाही. रियाने संजयशी घटस्फोट घेत टेनिसपटू लिएंडर पेसशी विवाह केला.

sanjay-dutt-rhea-pillai

 

१९९३ साली आयुष्यातलं मोठं वादळ

१९९३ साली संजय ‘आतिश’ सिनेमाच्या चित्रिकरणासाठी मॉरिशसला गेला. भारतात त्यावेळी 1993 सालच्या बॉम्बस्फोटांची कसून चौकशी सुरू होती. समीर हिंगोरा आणि हनीफ कडावाला या दोघांनी संजयकडे AK-56 रायफल असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर संजय जेव्हा मुंबईत परत आला. त्यावेळी दहशतवाद विरोधी कायदा ‘टाडा’अंतर्गत त्याला अटक झाली. संजयने कथितपणे ही कबुली दिली होती की अबू सालेमने १९९२मध्ये मॅग्नम व्हिडिओ कंपनीचा मालक समीर हिंगोरा आणि हनीफ कडावाला त्याच्या घरी आले होते. दरम्यान, संजयने यावेळी स्पष्टीकरण देताना म्हटले की ही हत्यारे त्याने त्याच्या सुरक्षेसाठी ठेवली होती.

sanjay-Dutt-1993-bomb
(Photo: Express Archive)

भोगलं कैद्याचं जीवन

या प्रकणात संजयला काही दिवस तुरुंगवास भोगावा लागला. एक वर्ष जामिनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा एकदा १९९४ च्या जुलैमध्ये संजयला तुरुंगात जावं लागलं. यावेळी संज दत्तला थेट कुख्यात गुंड, भयंकर आरोपींना ज्या ठिकाणी ठेवलं जातं त्या अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. १९९३ मध्ये झालेल्या मुंबई स्फोटात दोषी ठरलेला संजय दत्त येरवडा तुरूंगातून ४२ महिन्यांची शिक्षा भोगली. जेलमधून बाहेर पडताना ‘आजादी इतनी आसान नही’, अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती.

sanjay-dutt-tada-act

तिसरं लग्न केलं…

२००८ साली संजय दत्तने नोंदनी पद्धतीने मान्यताशी गोव्यात विवाह केला. तर त्यानंतर हिंदू पद्धतीने लग्नही केलं. त्याआधी 2 वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी मान्यता 29 वर्षांची होती. तर संजय दत्त 50 वर्षांचा होता. त्यांच्यातील वयाचा फरक नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्यात तब्बल 21 वर्षांचं अंतर आहे. 2010 साली मान्यता आणि संजय यांना दोन जुळी मुलं झालं. शरान आणि इकरा अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. दत्त कुटुंबासोबतच मान्यता त्यांचं प्रोडक्शन हाऊसही सांभाळते. संजयच्या प्रत्येक वाईट काळतही मान्यता त्याच्यासोबत खंबीरपणे उभी होती.

sanjay-dutt-third-marraige
(Photo: Express Archive)

आयुष्यातील इतक्या वादळांना तोंड दिल्यानंतरही आज संजय दत्त नव्या आशेने पुन्हा एकदा उभा राहिलाय. आज या वयातही काही लोकांसाठी तो संजूबाबाच आहेत. सरत्या वयातही त्यानं असं काही शरीरसौष्ठत्व कमावलं की सलमान खानही त्यापुढे फिका पडेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Big turning points in bollywood munna bhai sanjay dutt carrier ups and down prp

ताज्या बातम्या