Aamir Khan on underworld Dubai party invitation: १९८० आणि १९९० च्या दशकात बॉलीवूडवर अंडरवर्ल्डचा मोठा प्रभाव होता, हे जगजाहीर आहे. त्याच काळात आमिर खानने १९८८ साली चुलत भाऊ मन्सूर खानने दिग्दर्शित केलेल्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. आमिरचा सिनेमा हिट ठरला आणि त्याची लोकप्रियताही वाढली.
काही हिट चित्रपट दिल्यावर आमिर इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता झाला. त्या काळातील इतर अनेक अभिनेत्यांप्रमाणे आमिरलाही त्या काळी अंडरवर्ल्डकडून मिडल इस्टमध्ये आयोजित केलेल्या पार्टीला यायचं आमंत्रण मिळालं होतं. “मी मिडल इस्टमध्ये, कदाचित दुबईतील त्यांच्या पार्टीला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. अंडरवर्ल्डमधील काही लोक मला पार्टीसाठी आमंत्रित करण्यासाठी आले होते,” असा खुलासा आमिर खानने केला. पण ती दाऊद इब्राहिमची माणसं होती की नाही हे आमिरने उघड केलं नाही. “मी नावं घेणार नाही, अगदी इंडस्ट्रीतील लोकांचीही. हा माझा स्वभाव आहे,” असं आमिर लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता – आमिर खान
आमिर खान पुढे म्हणाला, “त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी मला पैसे ऑफर केले, इतकंच नाही तर मला आवडेल ते काम करायला मिळेल, असंही त्यांनी सांगितलं. पण तरीही मी नकार दिला. मग लगेचच त्यांचा सूर बदलला आणि म्हणाले की मला यावंच लागेल, कारण मी येणार असं आधीच जाहीर करण्यात आलंय. त्यामुळे हा त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न होता.”
तुम्ही मला जबरदस्ती नेऊ शकता, मी स्वतः येणार नाही – आमिर खान
“आमच्या शेवटच्या भेटीत मी त्यांना म्हटलं, ‘तुम्ही गेल्या एका महिन्यापासून मला भेटताय आणि मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगतोय की मी येणार नाही. तुम्ही खूप शक्तिशाली लोक आहात, तुम्ही मला मारू शकता, माझ्या डोक्यावर मारू शकता, माझे हातपाय बांधू शकता आणि मला जबरदस्तीने कुठेही घेऊन जाऊ शकता, पण मी स्वतःहून येणार नाही.’ त्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क केलं नाही,” असं आमिरने सांगितलं.
आमिरला कुटुंबासाठी वाटत होती भीती
आमिर खानने मान्य केलं की त्यावेळी तो खूप घाबरला होता, त्याला त्याच्या कुटुंबासाठीही भीती वाटत होती. “मला दोन लहान मुलं होती, माझे आई-वडील काळजीत पडले होते. ते मला म्हणाले, ‘तू काय करतोय? ते खूप धोकादायक लोक आहेत.’ मी त्यांना एकच गोष्ट म्हणालो होतो, ‘माझं आयुष्य मला हवं तसं जगायचंय. मला तिथे (पार्टीत) जायचं नाही,'” असं आमिर म्हणाला.
आपल्या जवळच्या लोकांचीही खूप काळजी वाटत होती, असं आमिरने नमूद केलं. दरम्यान, आमिरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्याने रीना दत्ताशी १९८६ मध्ये लग्न केलं. १९९३ मध्ये जुनैदचा जन्म झाला आणि १९९७ मध्ये त्यांची लेक आयराचा जन्म झाला. २००२ मध्ये रीना व आमिर यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरने किरण रावशी दुसरं लग्न केलं. तिच्यापासूनही आमिरने घटस्फोट घेतला आणि आता तो गौरी स्प्रॅटला डेट करतोय.