अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे शुक्रवारी, २७ जून रोजी निधन झालं. तिचं निधन नेमकं कशामुळे झालं हे पोस्ट मॉर्टम रिपोर्ट आल्यावरच कळेल. पण शेफालीच्या घरात तरुण दिसण्यासाठी घेतली जाणारी औषधं पोलिसांना सापडली. त्या औषधांचं शेफालीच्या मृत्यूशी कनेक्शन असल्याची चर्चा होत आहे.

४२ वर्षीय शेफालीला तिचा पती पराग शुक्रवारी अंधेरी येथील बेलेव्ह्यू मल्टिस्पॅशालिटी हॉस्पिटलला घेऊन गेला होता. पण तिला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केलं. शेफाली अँटी एजिंग ट्रीटमेंट व स्कीन ग्लोसाठी औषधं घेत होती. त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा, अशी चर्चा होत असतानाच तिची मैत्रीण पूजा घई हिने प्रतिक्रिया दिली आहे.

शेफालीची जवळची मैत्रीण पूजा घईने विकी लालवानीला सांगितलं की, शेफालीने तिच्या निधनाच्या दिवशी व्हिटॅमिन सी सलाईन लावलं होतं. “शेफालीने त्या दिवशी व्हिटॅमिन सी सलाईन लावलं होतं. पण व्हिटॅमिन सी घेणं ही फार सामान्य गोष्ट आहे. आपण सर्वजण व्हिटॅमिन सी घेतो. मला वाटतं करोनाच्या साथीनंतर लोकांनी नियमितपणे व्हिटॅमिन सी घेणं सुरू केलं आहे,” असं पूजा म्हणाली. स्वतःही व्हिटॅमिन सी सलाईन घेतल्याचं तिने सांगितलं.

“मी तिथे उभी होते, त्यावेळी पोलिसांनी तिला आयव्ही ड्रिप देणाऱ्याला बोलावलं, जेणेकरून ती कोणते औषध घेत आहे याचा तपास करता येईल. त्यावेळी आम्हाला समजलं की तिने आयव्ही ड्रिप लावलं होतं,” असं पूजा म्हणाली. फिल्म इंडस्ट्रीत अँटी एजिंग ट्रीटमेंट घेणं सामान्य असल्याचंही पूजाने म्हटलं.

व्हिटॅमिन सी सलाईन घेणं सामान्य- पूजा घई

व्हिटॅमिन सी सलाईनबद्दल बोलताना पूजा म्हणाली, “हे खूप सामान्य आहे. खरं तर, जर तुम्ही दुबईमध्ये रस्त्यावर फिरल असाल तर तिथे तुम्हाला क्लिनिक आणि सलूनमध्ये अशा अनेक व्हिटॅमिन सी ड्रिप दिसतात. शेफाली अशा इंडस्ट्रीत होती, जिथे तिला चांगलं दिसणं भाग होती. ती सर्वात बेस्ट होती. ती सुंदर दिसायची.”

जवळपास १० वर्षांपासून औषधं घेत होती शेफाली

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, शेफाली जवळजवळ १० वर्षांपासून अँटी-एजिंग इन्फ्युजन आणि ग्लूटाथिओन ही औषधं घेत होती. शेफालीने निधनाच्या दिवशी उपवास केला होता, कारण तिच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती. तरीही तिने दुपारी अँटी-एजिंग औषधाचे इंजेक्शन घेतले. मागील अनेक वर्षांपासून ती दर महिन्याला ते इंजेक्शन घ्यायची.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेफाली घरात १० ते ११ वाजताच्या दरम्यान बेशुद्ध पडली. तिला परागने रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शेफालीच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने तिचं निधन झालं असावं, असं म्हटलं जात होतं. पण पोलिसांनी रक्तदाब कमी झाल्याने निधनाची शक्यता वर्तवली आहे. घरात सापडलेले सलाईन आणि इतर औषधं पाहता तिचं निधन कशामुळे झालं याचा तपास सुरू आहे.