‘मीडियम स्पायसी’, ‘फोटो कॉपी’, ‘रमा माधव’, ‘विषय हार्ड’, ‘वाय झेड’, ‘टेक केअर गुड नाइट’, अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या अभिनेत्री पर्ण पेठे(Parna Pethe)ने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या ती चार चौघी या नाटकातून प्रेक्षकांचे मन जिंकून घेत असल्याचे दिसत आहे. आता ती जिलबी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मालिका, नाटक चित्रपटांतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री पर्ण पेठे आता ‘जिलबी’ चित्रपटात एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. पर्णने आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा ‘जिलबी’ चित्रपटातील रुबीना ही भूमिका वेगळी आहे. या चित्रपटात ती अत्यंत कणखर आणि धाडसी मुलगी आहे. आता या चित्रपटासाठी तिने होकार का दिला, याबद्दल वक्तव्य केले आहे

पर्ण पेठे काय म्हणाली?

अभिनेता स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांच्या भूमिका ‘जिलबी’ चित्रपटात आहेत. या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल बोलताना पर्णने म्हटले, “मी खूप काही ठरवून असं करत नाही. कथेमध्ये, भूमिकेत काही वेगळेपण असेल, तर ते करायला आवडतं. चांगल्या विषयामुळे मी या चित्रपटाला होकार दिला. माझ्या वेगवेगळ्या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून ‘जिलबी’ चित्रपटातील माझ्या या भूमिकेचं प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील”, असा विश्वास पर्ण पेठेने व्यक्त केला. याबद्दल अधिक बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “इतर जॉनरच्या चित्रपटांच्या तुलनेत मराठीमध्ये सस्पेन्स थ्रीलर असणाऱ्या चित्रपटांची संख्या फार कमी असून, ‘जिलबी’ हा चित्रपट त्यांची उणीव नक्की भरून काढणारा असेल”, असे म्हणत पर्ण पेठेने चित्रपटाविषयी व तिच्या भूमिकेविषयी वक्तव्य केले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे.‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ‘जिलबी’ चित्रपट १७ जानेवारीला आपल्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा: लक्ष्मी निवास मालिकेत ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री; जय श्री कृष्णा मालिकेत केलेले काम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या चित्रपटाच्या निमित्ताने स्वप्नील जोशी व प्रसाद ओक हे दोन लोकप्रिय अभिनेते पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. आता प्रेक्षकांना हा चित्रपट आवडणार का, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत.