Tejaswini Pandit Reacted to Marathi Language : राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. हिंदी भाषा सक्तीमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. सरकारच्या हिंदी भाषाच्या सक्तीला राजकीय वर्तुळातून विरोध झाला होता. तसंच मराठी मनोरंजन क्षेत्रातूनही अनेकांनी याबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.
हेमंत ढोमे, किरण माने, वैभव मांगले, सचिन गोस्वामी, अरविंद जगताप, सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, केदार शिंदे तसंच रवी जाधव यांनी सोशल मीडियावर हिंदी भाषा सक्तीबद्दलच्या पोस्ट शेअर केल्या होत्या. अभिनेत्री तेजस्विनी पंडीतनेही याविरुद्ध आवाज उठवला होता. शिवाय तिने मनसेच्या मोर्चालाही जाहीर पाठिंबा दिला होता. अशातच अभिनेत्रीने पुन्हा एकदा याप्रकरणी तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
याबद्दल ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनी म्हणाली, “मला वाटतं की, ज्या राज्यात मी राहते, ज्या भाषेत मी काम करते आणि ज्या भाषेमुळे माझं पोट भरत आहे त्या भाषेसाठी उभं राहणं माझं कर्तव्यच आहे. मला प्रचंड अभिमान आहे की, मी त्यासाठी उभी राहिली. यावर तुम्ही हिंदीत कसं काम करता? आणि तुम्ही वेगळ्या भाषेत कामच करणार नाही का? असं विचारणाऱ्यांना माझं असं सांगणं आहे की, भाषेला विरोध कधीच नव्हता.”
तेजस्विनी पंडीत इन्स्टाग्राम पोस्ट
यानंतर ती म्हणाली, “आम्ही हिंदी भाषेविरुद्ध नाही. आमचं त्या भाषेच्या सक्तीच्या विरुद्ध आंदोलन होतं. यात हिंदीचा मुद्दा कधीच नव्हता किंवा कोणती भाषा चांगली? कोणती भाषा वाईट? हाही मुद्दा नव्हता. मराठी भाषा हवी आणि ज्या राज्यात आपण राहतो, त्या राज्याची भाषाही मराठीच आहे. त्यामुळे इतरांनी ती भाषा शिकली तर आम्हाला आनंदच होईल.”
हिंदी भाषेत काम करण्याबद्दल तेजस्विनी म्हणाली, “आम्ही हिंदी सिनेमांमध्ये काम करतो. तिथेही आम्ही पैसे कमावतो. पण त्यासाठी आम्हाला हिंदी भाषेची सक्ती करावी नाही लागली. आम्ही पाचवीपासूनच हिंदी शिकलो आणि तरीही आम्ही हिंदी बोलतो. त्यात काम करतो आणि त्यातून पैसेही कमावत आहोत.”
यापुढे तिने सांगितलं, “पहिली ते चौथीच्या अगदी लहान मुलांवर आपण किती भाषांचं ओझं टाकणार आहोत आणि कोणत्या राज्यात? ज्या राज्याची भाषा मराठी आहे, ती त्यांना आलीच पाहिजे. शिवाय इंग्रजी ही जागतिक भाषा आहेच. मग आम्हाला तिसरी ऐछ्चिक भाषा म्हणून हिंदी, संस्कृत किंवा जर्मन भाषा शिकायची असल्यास ते स्वातंत्र्य असायला पाहिजे.”
यानंतर ती म्हणाली, “मला असं वाटतं की, आम्ही जे बोलत आहोत ते त्यांनाच कळेल जे सुज्ञ आहेत. सुशिक्षित आणि सुज्ञमध्ये जो फरक आहे, त्यापैकी सुज्ञ लोकांना हे नक्कीच कळेल की, आम्ही हिंदीविरोधात नाही तर, सक्तीच्या विरोधात आहोत.”
यानंतर तेजस्विनी जीआरबद्दल असं म्हणाली, “आता जो जीआर आला आहे, त्याचं स्वागत आणि आनंद आहे. हे मराठी माणसांचं यश आहे. मराठी माणसाची जी वज्रमूठ आहे कायम अशीच राहुदे. आपण सतर्क राहुयात की महाराष्ट्रावर आणि मराठीवर असा कुठल्याही पद्धतीने अन्याय होईल तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असा अट्टहास राहुदे.”