दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून या चित्रपटाची फक्त चर्चा सुरू आहे. हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. कारण तेव्हाच ‘स्त्री २’ आणि इतर चित्रपट प्रदर्शित होतं होते. आता ‘पुष्पा २ : द रुल’ डिसेंबरमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे सध्या चित्रपटाबाबत नवनवीन अपडेट समोर येत आहेत.
‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटाबाबत येणारी प्रत्येक अपडेट ही प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढवत आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा अल्लू अर्जुन लाल चंदनची तस्करी करून पोलीस आणि बॉक्स ऑफिसवर टक्कर देणाऱ्या चित्रपटांवर भारी पडणार आहे. अशातच या चित्रपटात ‘स्त्री’ची एन्ट्री होणार असल्याचं समोर आलं आहे. ‘स्त्री’ म्हणजे सध्या बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट देणारी श्रद्धा कपूरची ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटात वर्णी लागल्याचं म्हटलं जात आहे.
‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटात अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. त्यापैकी श्रद्धा कपूर एक असल्याची चर्चा सुरू आहे. श्रद्धा रश्मिका मंदानाची नव्हे तर समांथा रुथ प्रभूची जागा घेणार आहे. ‘पुष्पा : द राइज’ चित्रपटात ‘ऊ अंटावा’ या गाण्यावर समांथाने जबरदस्त डान्स केला होता. तिच्या डान्सने अक्षरशः सगळ्यांना वेड लावलं होतं. पण आता ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटात समांथाची जागा श्रद्धा कपूर घेणार असल्याचं समोर आलं आहे. माहितीनुसार, ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटातील आयटम साँगसाठी अनेक अभिनेत्रींना संपर्क करण्यात आला. अखेर आता श्रद्धा कपूरपर्यंत शोध काम येऊन थांबलं आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटात अल्लू अर्जुनबरोबर श्रद्धा जबरदस्त डान्स करताना दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा – “प्रिय आशुआई…”, अश्विनी एकबोटेंच्या पुण्यतिथी निमित्ताने सूनबाईची भावुक पोस्ट, म्हणाली, “आजचा दिवस…”
दरम्यान, आतापर्यंत ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली आहे. ‘पुष्पा पुष्पा’ आणि ‘सुसेकी’ ही दोन गाणी प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. ‘सुसेकी’ गाणं तर सगळ्यांची डोक्यावर घेतलं. ६ डिसेंबरला ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसंच दुसऱ्या बाजूला विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट देखील ६ डिसेंबरलाच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे ‘पुष्पा २ : द रुल’ आणि ‘छावा’ या दोन चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळणार आहे. आता कमाईत कोण बाजी मारणार? हे येत्या काळातच स्पष्ट होईल.