मराठी मनोरंजन सृष्टीतील बेधडक आणि स्पष्टवक्त्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे सुरभी भावे. सुरभीने आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमधून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. तर ‘स्वामिनी’ या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या कामाबद्दलचे अपडेट्स चाहत्यांना देत असतेच पण याबरोबरच समाजात घडणाऱ्या चांगल्या आणि तिला खटकणाऱ्या गोष्टींबद्दलही परखडपणे भाष्य करताना दिसते. तर तिची छेड काढणाऱ्या चार जणांना तिने आतापर्यंत चोप दिला असल्याचा खुलासा केला आहे.
सुरभी सोशल मीडिया बरोबरच यू ट्यूबवरही सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच तिने स्वतःचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्यावरती विविध व्हिडिओ शेअर करत आतापर्यंत तिला आलेले अनुभव मोकळेपणाने चाहत्यांना सांगत असते. तर तिने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करून तिच्या शालेय जीवनातील काही आठवणी शेअर केले आहेत.
ती म्हणाली, “मी मुळची कोकणातली आहे. गुहागरची. पहिली ते चौथी माझं शिक्षण गुहागरमध्ये झालं. पण माझ्या आयुष्याला राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेमुळे कलाटणी मिळाली. ही आशिया खंडातील मुलींसाठीची पहिली सैनिकी शाळा आहे. या शाळेच्या पहिल्या बॅचची मी पास आऊट आहे.”
याबद्दल अधिक माहिती देताना ती म्हणाली, “त्या शाळेत हॉस्टेलमध्ये राहणं अनिवार्य होतं. तिथे अभ्यासाबरोबरच स्विमिंग, योगा, रायफल शूटिंग, कराटे अशा गोष्टींचंही प्रशिक्षण मिळतं. तर त्याशिवाय तिथे सैनिकी प्रशिक्षणही दिलं जातं. त्यामुळे आजवर माझी छेड काढणाऱ्या चार मुलांना मी हाणलं आहे. याचं सगळं श्रेय या शाळेतील ट्रेनिंगला जातं.” तर आता तिचं हे बोलणं चर्चेत आलं असून तिच्या हिंमतीचं सर्वजण कौतुक करत आहेत.