अद्ययावत सिग्नल यंत्रणेचाही मार्ग मोकळा; ‘एमयूटीपी ३’ एमधील प्रकल्पांसाठी सल्लागार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

मुंबई : पश्चिम व मध्य रेल्वेवरील १९ उपनगरीय स्थानकांच्या रखडलेल्या विकासकामाला वेग मिळणार आहे. ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’च्या (एमआरव्हीसी) एमयूटीपी-३ अंतर्गत या स्थानकांच्या विकासाबरोबरच अद्ययावत सीबीटीसी (कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टम) सिग्नल यंत्रणेच्या कामालाही गती मिळणार आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १३ एप्रिल २०२० ही त्यासाठी अंतिम मुदत असून त्यासाठी काही जणांनी अर्जही केले आहेत. हे प्रकल्प वेळेत मार्गी लागल्यास १९ स्थानकांवर मोठय़ा प्रमाणात सोयीसुविधा  उपलब्ध होतील.

प्रवाशांच्या तुलनेत उपनगरी स्थानकांतील सुविधा अपुऱ्या आहेत. अरुंद फलाट, फलाटांवर जागा अडवणारे स्टॉल यामुळे प्रवाशांना चालणेही कठीण होते. त्यात अपुरे पादचारी पूल, सरकते जिने, प्रसाधनगृहांची कमतरता व त्यांची स्वच्छता हे प्रश्नही आहेत. त्यामुळेच एमआरव्हीसीमार्फत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे, डोंबिवलीसह एकूण सात, हार्बरवरील चेंबूर, गोवंडीसह चार आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेन्ट्रल, जोगेश्वरी, कांदिवली यासह एकूण आठ स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळे स्थानकांवर अनेक सुविधांची भर पडेल.

याशिवाय सीबीटीसी ही अत्याधुनिक डिजिटलाईज्ड सिग्नल यंत्रणा मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, सीएसएमटी ते पनवेल आणि पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरारदरम्यान कार्यरत होईल. सिग्नल यंत्रणेत मोठे बदल करून दोन लोकल फेऱ्यांमधील वेळ कमी होऊन फेऱ्यांची

संख्या  वाढेल.

या दोन्ही कामांकरिता सल्लागार नेमले जात आहेत. याकरिता एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून (एआयआयबी) जवळपास ३,५०० कोटी रुपये निधी मिळेल. काही निधी या दोन प्रकल्पांसाठी खर्च केला जाईल, तर उर्वरित निधी रेल्वे व राज्य सरकारकडून उपलब्ध होईल. बँकेने घातलेल्या अटींनुसार प्रकल्पांसाठी पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम, जमीन अधिग्रहण इत्यादींचा योग्य अभ्यास करून अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांच्या कामांनाही गती मिळेल, असे एमआरव्हीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

काय बदल होणार?

  • रेल्वे स्थानक हद्दीत जास्तीत जास्त मोकळी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न.
  •  फलाटावर प्रवाशांना वावरण्यासाठी अधिक जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील.
  •  नवीन पादचारी पूल, अधिक सरकते जिने, लिफ्ट.
  • तिकीट खिडक्या, खाद्यपदार्थ स्टॉलच्या रचनेत बदल.
  •   चांगली आसनव्यवस्था आणि प्रसाधनगृहे देण्याचा प्रयत्न.