मुंबईः काळाचौकी पोलिसांनी कॉटन ग्रीन परिसरात मोठी कारवाई करत २५ लाख रुपये किमतीचे बनावट चलन जप्त केले. या सर्व नोटा बनावट असून त्या एका गठ्ठ्यामध्ये गुंडाळून वितरणासाठी तेथे आणण्यात आल्या होत्या. या प्रकरणात अंकित दीनानाथ पराशर याला अटक करण्यात आली असून, समा हुसेन लतीफ, कबीर आणि रंजीत बेहरा हे इतर संशयित आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
काळाचौकी पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय तक्रारदाराशी कबीर आणि नवाब मोक्कार या दोन व्यक्तींनी संपर्क साधून त्याला ५०० रुपयांच्या बनावट नोटा विकायच्या असल्याचे सांगितले. या सर्व नोटा चांगला प्रतीच्या असून कॅश डिपॉझीट मशीन व स्कॅनिंग एटीएममधूनही सहज स्वीकारल्या जातील असा दावा आरोपींकडून करण्यात आला. त्यातून चांगला फायदा होईल, त्यांनी एक लाख रुपयांमध्ये पाच लाखांचे बनावट चलन देण्याचे आमिष दाखवले. हा सर्व प्रकार संशयास्पद वाटला.
त्यामुळे तक्रारदाराने याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक हसन मुलानी यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार त्यांच्या कालावर घातला. प्रकरणाचे गांभीर लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथकांची स्थापना करण्यात आली आणि रे रोड स्थानकाच्या पूर्व परिसरात सापळा रचला.
तक्रारदाराने २८ जून २०२५ ला मध्यरात्री संशयितांशी भेटीची वेळ निश्चित केली. अंकित बनावट नोटा घेऊन येणार असल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले. अंकित तेथे पोहोचताच तक्रारदाराने पोलिसांना संकेत दिले आणि पोलिसांनी त्याला अटक केली.
झडतीदरम्यान अंकितकडे पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचे पाच गठ्ठे सापडले. प्रत्येक गठ्ठ्यातील फक्त वरच्या काही नोटा खऱ्या असून उर्वरित सर्व बनावट असल्याचे त्याने कबुल केले. या टोळीने एक लाख रुपयांमध्ये ५ लाखांच्या बनावट नोटा देऊन फसवणूक करण्याचा डाव होता, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
या टोळीने गेल्या काही आठवड्यांत अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. या बनावट चलन रॅकेटमागील मुख्य सूत्रधार आणि अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे. अंकीत पोलीस कोठडीत असून अंकितच्या चौकशीतून पोलिसांना इतर आरोपींची माहिती मिळाली. आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.