मुंबई : देशभरातील जादा मागणी असलेल्या विविध मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ करण्यात आली आहे. परंतु, मुंबई-गोवा जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यात अद्याप वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकणातील वंदे भारत दुर्लक्षित असून, प्रवाशांची मागणी असून देखील, ८ डब्यांच्या सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस डब्यात वाढ करण्यात आली नाही.
आर्थिक वर्ष २०२५-२६ नुसार वंदे भारत एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या क्षमतेच्या आधारावर १६ डब्यांच्या तीन वंदे भारत एक्स्प्रेस २० डब्यांची आणि ८ डब्यांच्या चार वंदे भारत एक्स्प्रेस १६ डब्यांच्या केल्या आहेत. यामध्ये मंगळुरु सेंट्रल – तिरुवनंतपुरम सेंट्रल, सिकंदराबाद – तिरुपती आणि चेन्नई एग्मोर – तिरुनेलवेली १६ डब्यांच्या वंदे भारत २० डब्यांच्या केल्या आहेत. तर, मदुराई – बेंगळुरू कॅन्ट, देवघर – वाराणसी, हावडा – राउरकेला आणि इंदूर – नागपूर या ८ डब्यांच्या वंदे भारत १६ डब्यांच्या केल्या आहेत. परंतु, यामध्ये सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश करण्यात आला नाही.
जून २०२३ मध्ये गोव्यातील आणि कोकण रेल्वेवरील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मडगाववरून धावण्यास सुरुवात झाली. वंदे भारत सुरू झाल्यापासून या रेल्वेगाडीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. देशविदेशातील पर्यटकांना आरामदायी, वेगवान प्रवासाची अनुभूती मिळण्यास सुरुवात झाल्याने पर्यटकांच्या ही वंदे भारत पसंतीस पडली. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट आरक्षण मर्यादेपेक्षा जास्त होऊन प्रतीक्षा यादी सुरू होते. त्यामुळे या रेल्वेगाडीला १६ किंवा २० डबे जोडण्याची मागणी जोर धरत आहे.
गणेशोत्सव कालावधीत काही दिवसांसाठी सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला १६ डबे जोडण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत मिळाली. हे डबे तात्पुरत्या स्वरुपात जोडण्यात आले होते. या वंदे भारत एक्स्प्रेसला वर्षभर प्रतिसाद मिळतो. तर, दसरा, दिवाळी, नाताळ सणानिमित्त प्रवाशांची मागणी आणखी वाढणार आहे. त्यामुळे या वंदे भारत रेल्वेगाडीच्या डब्यात वाढ करण्यात यावी, असे मत प्रवासी प्रथमेश प्रभू यांनी व्यक्त केले.
जालना – सीएसएमटी आणि सोलापूर – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसच्या देखभालीचे काम नांदेड विभागात हस्तांतरित केल्याने, मुंबईत अतिरिक्त पिट लाईन आणि देखभाल बँडविड्थ उपलब्ध झाली आहेत. यामुळे सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या १६ डब्यांची देखभाल दुरूस्ती करण्यास मुंबईतील वाडी बंदर येथे जागा उपलब्ध झाली आहे, असे प्रभू यांनी सांगितले.