लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,०३० घरांच्या सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी गुरुवारी मुंबई मंडळाने म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. या यादीनुसार एक लाख १३ हजार ५४२ अर्जदार पात्र ठरले आहेत. त्यामुळे आता सोडतीमध्ये हे अर्जदार सहभागी होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सुमारे २६९ अर्जदार अपात्र ठरले आहेत. आता पात्र अर्जदारांचे लक्ष ८ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतीच्या निकालाकडे लागले आहे.

मुंबई मंडळाने गोरेगाव, कांदिवली, जुहू, विक्रोळी, दादर, वडाळा, वरळी, ताडदेव आदी परिसरातील २,०३० घरांसाठी ९ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली होती. मुदतवाढीनुसार ही प्रक्रिया १९ सप्टेंबर रोजी संपुष्टात आली. त्यानुसार ९ ऑगस्ट ते १९ सप्टेंबरदरम्यान मंडळाकडे अनामत रक्कमेसह एक लाख १३ हजार ८११ अर्ज सादर झाले होते. अर्जांच्या छाननीअंती एक लाख १३ हजार २३५ अर्ज पात्र, तर ५७६ अर्ज अपात्र ठरले.

आणखी वाचा-पात्र झोपडीधारकाकडून खरेदी केलेल्यांना दिलासा; राज्य सरकारची अभय योजना

नियमानुसार अपात्र अर्जदारांना सूचना – हरकती सादर करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. या विहित मुदतीत आलेल्या सूचना – हरकतींचा विचार करून गुरुवारी सायंकाळी ६ वाजता मुंबई मंडळाने म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली. या अंतिम यादीनुसार एक लाख १३ हजार ५४२ अर्जदार पात्र, तर २६९ अर्जदार अपात्र ठरले आहेत, अशी माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या यादीनुसार आता सोडतीत एक लाख १३ हजार ५४२ अर्जदार सहभागी होणार आहेत.

पात्र अर्जदारांच्या अंतिम यादीनुसार म्हाडाच्या विखुरलेल्या योजनेतील घरांसाठी ४६ हजार २४७ अर्जदार, निर्माणाधीन प्रकल्पातील घरांसाठी ४७ हजार ४९७ अर्जदार, तर पुनर्विकासातून उपलब्ध झालेल्या ३७० घरांसाठी १८ हजार ७९८ अर्जदार पात्र ठरले आहेत. अपात्र ठरलेल्या २६९ अर्जदारांपैकी अनेकांनी उत्पन्नाची चुकीची माहिती दिली आहे.

आणखी वाचा-झोपु भूखंडाची मालकी विकासकांना देण्यास विरोध! गृहनिर्माण धोरणावर ग्राहक पंचायतीकडून हरकती-सूचना सादर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोडतीला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

अपात्र अर्जदारांमध्ये अधिवासाचे बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. अधिवासाचे बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांविरोधात मंडळाकडून कारवाई होणार का हा प्रश्न आहे. दरम्यान, आता पात्र अर्जदारांचे लक्ष्य ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणाऱ्या सोडतीच्या निकालाकडे लागले आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमधील सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.