मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये सुमारे १४ लाख ३६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, शेतकऱ्यांना योग्य ती मदत देण्यात येईल, असे भरणे यांनी सांगितले.
राज्यात १५ ते २० ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. यामध्ये नांदेड, यवतमाळ, अकोला आदी जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात पीक उद्ध्वस्त झाले. तसेच सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. तर काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांचेही नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार नुकसानीच्या पंचनाम्याचे सुरू झालेले काम अंतिम टप्प्यात असून, शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. – दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री.
सर्वाधिक बाधित जिल्हे
- नांदेड : ६,२०,५६६ हेक्टर
- वाशीम : १,६४,५५७ हेक्टर
- यवतमाळ : १,६४,९३२ हेक्टर
- धाराशिव : १,५०,७५३ हेक्टर
- बुलढाणा : ८९,७८२ हेक्टर
- अकोला : ४३,८२८ हेक्टर
- सोलापूर : ४७,२६६ हेक्टर
- हिंगोली : ४०,००० हेक्टर