मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर ओसरला आहे. अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, आता पुन्हा मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबईसह ठाणे पालघर भागात रविवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यंदा मोसमी पाऊस मुंबईत लवकर दाखल झाला असला तरी, जून महिन्यात फारसा पाऊस पडलेला नाही. जून महिन्यातील चार – पाच दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सरासरी एवढा पाऊस झाला. याखेरीज मुंबईत सुरुवातीपासून फारसा पाऊस पडलेला नाही. दरम्यान, मुंबई शहर, तसेच उपनगरात बुधवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली होती. दादर, वांद्रे, बोरिवली, अंधेरी या भागात पावसाचा जोर अधिक होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत ७ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ४ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच सांताक्रूझ येथे बुधवारी नेहमीपेक्षा कमी कमाल तापमान नोंदले गेले आहे. येथे २९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तापमानातही काहीशी वाढ झाली होती. त्यामुळे दिवसभर उकाडा सहन करावा लागत होता. दरम्यान, मुंबईसह ठाणे आणि पालघर भागात रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत काही भागात पावसाचा जोर अधिक असेल.

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यातील इतर भागातही पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर राहणार आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या सर्वच जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळेल. तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर फारसा नसेल, काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील. याचबरोबर विदर्भातही शनिवारपर्यंत पावसाचा जोर कमी राहील. त्यानंतर विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पावसाचा अंदाज कुठे

मुसळधार पाऊस

मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाट परिसर

अतिमुसळधार पाऊस

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर

हलक्या सरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्या नगर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला</p>