मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत राज्यात सर्वदूर आणि समाधानकारक पाऊस झाला आहे. राज्यात १ जून ते २२ ऑगस्ट, या काळात सरासरी ७४१.१ मिमी पाऊस पडत असला तरी प्रत्यक्षात ७९३.६ मिमी पाऊस पडला आहे. सरासरीपेक्षा सात टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील जलाशयांमध्येही क्षमतेच्या ८२ टक्के एवढा चांगला साठा झाला आहे.
राज्यात चांगल्या पावसाने जलाशयांमधील परिस्थिती सुधारली आहे. राज्यातील जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या ८२ टक्के साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जलाशयांमध्ये सुमारे ७० टक्के साठा होता. या तुलनेत यंदा पाण्याचा साठा अधिक झाला आहे. जलाशयांमध्ये चांगला साठा झाल्याने पुढील वर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
विभागनिहाय विचार करता, कोकणात सरसरीपेक्षा दहा टक्के, मध्य महाराष्ट्रात आठ टक्के, मराठवाड्यात एक टक्के आणि विदर्भात पाच टक्के जास्त पाऊस पडला आहे. नाशिकमध्ये सर्वाधिक सरासरीपेक्षा ३३ टक्के, मुंबई उपनगरात ३० टक्के तर, कोल्हापूरमध्ये सरासरीपेक्षा २८ टक्के जास्त पाऊस पडला आहे.
राज्यातील ३८ पैकी एकूण १२ जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत दहा टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यापैकी पालघरमध्ये २३ टक्के, रायगडमध्ये १२ टक्के, रत्नागिरीत १३ टक्के, पुण्यात १४ टक्के, सांगलीत २० टक्के, धाराशिवमध्ये २४ टक्के, नांदेडमध्ये १० टक्के, गडचिरोलीत १७ टक्के, नागपुरात १० टक्के आणि वर्ध्यात ११ टक्के जास्त पाऊस पडला आहे.
१३ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस
राज्यात मोसमी पावसाने सरासरी ओलांडली असली तरीही सरासरीच्या तुलनेत जालना, सातारा आणि सोलापुरात प्रत्येकी १९ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्या खालोखाल हिंगोलीत १७ टक्के, नंदूरबारमध्ये १६ टक्के, अकोल्यात १५ टक्के, अमरावतीत १३ टक्के, धुळ्यात १० टक्के, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये प्रत्येकी ७ टक्के, मुंबई शहर आणि लातूरमध्ये प्रत्येकी ५ टक्के आणि गोंदियात ३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
कमी काळात जास्त पावसामुळे शेतीचे नुकसान
राज्यात पावसाने सरासरी गाठली असली तरीही वितरणात असमानता आणि कमी काळात जास्त पाऊस पडण्याच्या घटना घडल्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या नांदेड, वाशिम, बीडमध्ये सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडला आहे, कमी काळात जास्त पाऊस पडल्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे सुमारे ८.५० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
कोकणात सर्वाधिक जलसाठा
नागपूर – ७१.९८ टक्के
अमरावती – ७९.९४ टक्के
छत्रपती संभाजीनगर – ७६.३६ टक्के
नाशिक ७३.३८ टक्के
पुणे ८९.१२ टक्के
कोकण – ९०.९९ टक्के