मुंबई : केईएम रुग्णालयाच्या हृदयरोग विभागाने शस्रक्रियेतील अत्याधुनिक तसेच करण्यास कठीण समजल्या जाणाऱ्या मायट्रल झडप दुरुस्ती (एम-टीइइआर) ही शस्त्रक्रिया करून एक गरजू महिला रुग्णाचे प्राण वाचवले. विशेष म्हणजे, या प्रक्रियेसाठी लागणारे क्लिप्स उपकरण ज्याची किंमत साधारणपणे २० लाख इतकी आहे ते रुग्णासाठी पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिले.

लातूर येथे राहाणाऱ्या रमाबाई या ६६ वर्षांच्या महिलेला पूर्वी ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. सुरुवातीला त्यांची प्रकृती ठिक होती. तथापि गेल्या पाच सहा मिहन्यांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंंतर तपासणीत त्यांच्या हृदयातील मायट्रल झडपेमध्ये गळती असल्याचे निदर्शनास आले. औषधोपचार सुरु असूनही लक्षणे वाढतच राहिली. परिणामी त्यांच्या छातीतल्या झडप बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यांच्या वयाच्या तसेच अन्य आजारांचा विचार करता तसेच ह्रदयाची कार्यक्षमता लक्षात घेता लातूर येथील डॉक्टरांनी त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात जाण्यास सांगितले.

केईएममध्ये ह्रदयविकार विभागाचे प्रमुख डॉ अजय महाजन व त्यांच्या टीममधील डॉक्टरांनी सखोल तपासणी केल्यानंतर पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा एम-टीइइआर ही अत्याधुनिक व कॅथेटरद्वारे केली जाणारी कमी आघाताची (मिनिमल इनव्हेसिव्ह) पद्धत निवडली. या प्रक्रियेमध्ये मायट्रल झडपावर एक क्लिप बसवून झडप पूर्णपणे बंद होईल याची खात्री केली जाते.

या शस्त्रक्रियेसाठी पराकोटीचे कौशल्य लागत असून शस्रक्रियेदरम्यान हार्ट सर्जनची टीम तयार ठेवावी लागते. या शस्त्रक्रियेसाठी लागणारी मायक्लिप हे उपकरण भरातीय बनावटीचे घेतल्यास त्यासाठी साधरणपणे २० लाख रुपये इतका खर्च येतो तर परदेशी मायक्लिप घेतल्यास ३५ लाख रुपये लागू शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. लातूर येथील रुग्णाच्या नातेवाईकांची एवढी आर्थिक क्षमता नसल्यामुळे डॉ महाजन यांनी हे उपकरण बनविणाऱ्या मेरिल लाईफ सायन्स या कंपनीला विनंती केली. त्यानुसार सदर कंपनीने मायक्लिप विनामूल्य उपलब्ध करून दिले.

त्यानंतर डॉक्टर अजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया कोणत्याही गुंतागुंतीशिवाय पार पडली. रमाबाई यांना केईएममध्ये १७ जूनरोजी दाखल करण्यात आले होते तर २५ जून रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. संपूर्ण उपचारासाठी रुग्णाकडून फक्त २६०० रुपये बीपीएमसी शुल्क आकारण्यात आले. सध्या रमाबाई अतिदक्षता विभागात असून त्यांची प्रकृती उत्तम असून लवकरच त्यांना घरी पाठवले जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले.

केईएमच्या ह्रदयविकार विभागात यापूर्वीही अनेक दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून सदरची शस्त्रक्रिया ही ह्रदयविकार विभागाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा मानली जात आहे. यापूर्वी येथे टीएमव्हीआर म्हणजे ट्रान्स कॅथेटर मयट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट, टीएव्हीआय – ट्रान्स कॅथेटर एरोटिक व्हॉल्व्ह इंप्लांटेशन, टीईव्हीएआर- ट्रान्स कॅथेटर एंन्डोव्हॅस्क्युलर व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटसारख्या अत्यंत जटील प्रोसिजर करण्यात आल्या असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

या शस्त्रक्रियेत युनिट प्रमुख डॉ चरण लांजेवार, अतिरिक्त प्राध्यापक डॉ गिरीश सबनीस, सहाय्यक प्राध्यापक डॉ अंकिता कुलकर्णी, सहाय्यक प्राध्यापक डॉ आदिती परस्मू तसेच इकोकार्डीयॉग्राफी तज्ञ डॉ. गौरव शिंदे , डॉ. धीरज कुमार, डॉ. किरन राठोड, डॉ. पुण्यप्रताप कुजर तसेच ॲनेस्थेशियाच्या डॉ संगीता उमरकर, सीव्हीटीसीचे प्रमुख डॉ उदय जाधव यांची टीम यांची मोलाची मदत झाल्याचे विभागप्रमुख डॉ अजय महाजन यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केईएमच्या या ह्रदविकार विभागात एकूण ४० खाटा असून अतिदक्षता विभागात २४ खाटा आहेत. २०२४ मध्ये वर्षभरात कॅथलॅबमध्ये केलेल्या उपचारांची संख्या थक्क करणारी आहे. तब्बल ११११ प्रक्रिया येथे पार पडल्या. साधारपणे १२३२ अँजिओग्राफी करण्यात आल्या तर ९१६ कोरोनरी अँजिप्लास्टी रुग्णांवर करण्यात आल्या. याशिवाय १०३ व्हॉल्व्होप्लास्टी करण्यात आल्या असून ७७ दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. वर्षाकाठी काही हजार रुग्णांची येथे बाह्यरुग्ण विभागात तपासणी केली जात असून ह्रदयविकाराच्या गोरगरीब रुग्णांसाठी केईएमचा हा ह्रदयविकार विभाग जीवनदायी बनला आहे.