मुंबई : जून महिन्यात नांदेड विशेष ट्रेनमध्ये एका डॉक्टर दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला करून लुटणाऱ्या कुख्यात चोराला केरळ पोलिसांनी अटक केली. या हल्ल्यात पनवेलमधील ५० वर्षीय डॉक्टर देशमुख यांना आपला एक हात गमवावा लागला होता. आरोपीला पुढील तपासासाठी कुर्ला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
डॉ. योगेश देशमुख (५०) आणि डॉ. दिपाली देशमुख (४४) दाम्पत्य पनवेल येथे राहतात. डॉ. देशमुख यांचे पनवेलच्या कामोठे येथे सदगुरू कृपा आयुर्वेद रुग्णालय आहे. देशमुख दाम्पत्य आणि ९ वर्षांची मुलगी श्रध्दा असे तिघे बुधवार, ४ जून २०२५ रोजी नांदेड येथे नातेवाईकाकाडे जाण्यासाठी निघाले होते. लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथून त्यांनी रात्री १ वाजता सुटणारी एलटीटी – नांदेड विशेष ट्रेन पकडली. तिघे एस-४ बोगीत चढले होते.
डॉ. दिपाली देशमुख मधल्या बर्थवर होत्या. त्यांचे पती डॉ. योगेश वरच्या बर्थवर आणि मुलगी श्रध्दा समोरील बर्थवर झोपली होती. त्यावेळी एक अनोळखी इसम ट्रेनमध्ये शिरला. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास त्याने डॉ. दिपाली देशमुख यांच्या खाद्यावरील पर्स खेचण्याच्या प्रयत्न केला. त्याला डॉ. दिपाली यांनी प्रतिकार केला. या खेचाखेचीत त्या अनोळखी व्यक्तीने त्यांना डब्याच्या खाली खेचले आणि त्या ट्रेनखाली खाली पडल्या. तो गोंधळ पाहून डॉ. योगेश उठले पण पत्नी खाली पडल्याचे बघताच त्यांनी ट्रेनमधून खाली उडी मारली. त्यात त्यांचा डावा हात तुटून खाली पडला.
आरोपीला पकडण्यात रेल्वे पोलिसांना अपयश
या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात कलम ३०९ (४) आणि ३०९(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले होते. प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. हल्लेखोर चोराच्या शोधासाठी रेल्वे पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. मात्र जंगजंग पछाडूनही मुंबई रेल्वे पोलिसांना आरोपीला पकडण्यात अपयश आले होते.
केरळ पोलिसांनी केली अटक
केरळच्या कोझीकोडे रेल्वे स्थानकात ८ ऑगस्ट रोजी एका महिला रेल्वे प्रवाशांची बॅग एका चोराने खेचली होती. यावेळी झालेल्या हल्ल्यात महिला खाली पडली आणि तिला गंभीर जखमा झाल्या होत्या. याप्रकऱणी अज्ञात चोराविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केरळ रेल्वे पोलिसांनी या प्रकऱणाचा तपास केला आणि मोहम्मद सैफ उर्फ असगर अली चौधरी (४२) याला अटक केली. तपासात त्याने नांदेड एक्स्प्रेसमध्ये डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला केल्याची कबुली दिली. त्याला पुढील तपासासाठी कुर्ला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सेल्समन ते सराईत चोर
पोलिसांनी आरोपीबाबत माहिती देतांना सांगितले की, आरोपी असगर अली चौधरी हा मुळचा मुंबईचा होता. रेल्वेमध्ये तो सामान विकत होता. सामान विकताना तो रात्रीच्या वेळी झोपलेल्या प्रवाशांच्या बॅगा चोरू लागला. ते काम त्याला सोपे वाटले आणि पुढे चोरीत सक्रिय झाला. त्यानंतर तो दिल्लीला रहायला गेला. जून – ऑगस्ट असे ३ महिने तो मुंबईत चोरी करायला येत होता. त्याच्या नावावर ३४ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
डॉक्टर देशमुख अद्यापही धक्क्यात
या हल्ल्यानंतर डॉ. देशमुख अद्याप धक्क्यातून सावरलेले नाही. त्यांचा दवाखाना बंद झाला आहे. आपला एक हात नाही ही भावना त्यांना सलत आहे. डॉ. देशमुख यांच्यावर हात प्रत्यारोपणाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्याला वेळ लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.