मुंबई : राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. या अधिवेशनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावत प्रसारमाध्यमांशी संवादही साधला आहे. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी बोलताना एका मराठी मालिकेच्या वृत्तपत्रातील जाहिरातीचा आधार घेत भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्षपणे टोला हाणत जोरदार टीका केली आहे. मार्क्स आणले शंभर पैकी शंभर, कमळी आमची एकच नंबर… पण मला उत्सुकता आहे की या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का? तिने इव्हीएम वापरले होते का? असे ठाकरे यांनी म्हटल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे नियोजन होते. मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संघटनांनी राज्यातील शाळांमधील हिंदी सक्तीला जोरदार विरोध केला. विरोधी पक्षांनी कोंडी केल्यानंतर भाजपच्या नेतृत्वातील सरकारने त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन शासकीय आदेश रद्द करण्याची घोषणा केली. मात्र मराठीसह विविध मुद्यांवरून विरोधी पक्षांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात असून विधिमंडळाच्या आवारात जोरदार निदर्शने केली जात आहेत. या पावसाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे यांनीही हजेरी लावली आहे. तत्पूर्वी त्यांनी विधिमंडळाच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधत मराठीसह विविध मुद्यांवर भाष्य करीत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यांनी ‘कमळी’ या मराठी मालिकेच्या जाहिरातीचा आधार घेत भाजपवर टीका केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झी मराठी वाहिनीवर सोमवार, ३० जूनपासून दररोज रात्री ९ वाजता ‘कमळी’ ही नवीन मालिका दाखविण्यात येणार आहे. यानिमित्ताने मार्क्स आणले शंभर पैकी शंभर, कमळी आमची एकच नंबर; शहरातल्या टॉप कॉलेजात ॲडमिशन मिळाल्याबद्दल कमळीचं हार्दिक अभिनंदन, अशा आशयाची जाहिरात मराठी वृत्तपत्रांमध्ये देण्यात आली आहे. याच जाहिरातीचा आधार घेऊन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे. ‘आज सर्वांनी मार्क्स आणले शंभर पैकी शंभर, कमळी आमची एकच नंबर; अशा आशयाची जाहिरात मराठी वृत्तपत्रांमध्ये पाहिलेली आहे. त्यामुळे मला उत्सुकता आहे की ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकलेली आहे? या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का? तिने शंभर मार्क कसे मिळवले? या शंभर मार्कांसाठी तिने इव्हीएम वापरले होते का? याची मला उत्सुकता आहे. कमळी आमची एक नंबर बोलणाऱ्यांना मला बघायचे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.