Asia’s First Woman Loco Pilot / मुंबई : आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या ३६ वर्षांच्या कारकीर्दीमुळे स्त्री-पुरूष भेदभाव मोडून, पुरूषप्रधान रेल्वे क्षेत्रात असंख्य महिलांसाठी मार्ग मोकळा झाला. त्यांच्या प्रेरणेने आणि प्रशिक्षणाने अनेक महिला लोको पायलट घडल्या आहेत.
साताऱ्यात जन्म झालेल्या सुरेखा यादव १९८९ मध्ये भारतीय रेल्वेत रुजू झाल्या आणि १९९० मध्ये सहाय्यक चालक झाल्या. त्यासोबतच, त्यांनी आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक म्हणून इतिहास रचला. या पदाने त्यांना संपूर्ण खंडात ओळख मिळवून दिली. १९९६ पर्यंत त्या रेल्वेच्या मालगाड्या चालवत होत्या. त्यानंतर २००० सालापासून पुढे त्यांनी उपनगरीय रेल्वे, डेक्कन क्वीन, वंदे भारतसह अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेसचे सारथ्य केले.
सुरेखा यादव यांनी त्यांच्या ३६ वर्षांच्या कारकीर्दीत मालगाड्यांपासून उपनगरीय लोकलपर्यंत आणि नियमित लांबपल्ल्याच्या गाड्यांपासून राजधानी आणि वंदे भारत सारख्या एक्स्प्रेस चालवल्या आहेत. सोलापूर – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वंदे भारत एक्स्प्रेसचे १३ मार्च २०२३ रोजी सारथ्य करून सुरेखा यादव रेल्वेच्या बदलत्या इतिहासाच्या साक्षीदार बनल्या. सोलापूर – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसच्या पहिल्या फेरीचे सारथ्य यादव यांनी केले.
सुरेखा यादव यांचा प्रवास –
- १९८९ ते १९९३ मालगाडीच्या सहाय्यक इंजिन चालक.
- मार्च १९९३ ते ऑगस्ट १९९३ पर्यंत इगतपुरी घाट इंजिनचे सहायक चालक.
- सप्टेंबर १९९३ ते एप्रिल १९९४ मध्ये लोणावळा घाटात मेलला धक्का देणाऱ्या इंजिनचे सहायक चालक.
- ऑगस्ट १९९४ ते मार्च १९९५ पर्यंत मालगाडी इंजिन चालक.
- १९९८ मध्ये रेल्वेची पहिली महिला विशेष लोकल चालविण्याचा मान.
- ८ मार्च २०११ रोजी पुणे – मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस चालविली.
- १३ मार्च २०२३ रोजी सोलापूर – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वंदे भारत एक्स्प्रेस चालवली.
- कल्याण येथील मोटरमन केंद्रात भावी मोटरमनला प्रशिक्षण देण्याचे काम केले.
आशिया खंडातील पहिल्या महिला रेल्वे चालक म्हणून सुरेखा यादव यांना नवी दिल्ली येथे ९ जून २०२४ रोजी नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले होते. भारतीय रेल्वेमध्ये सुरेखा यादव यांच्याकडे महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. त्यांच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक केले गेले.