मुंबई : देशभरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अखत्यारीतील द्रुतगती महामार्गावरील पथकर नाक्यांवरून प्रवास करण्यासाठी शुक्रवार, १५ ऑगस्टपासून फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू झाली आहे. एनएचएआयने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी अंदाजे एक लाख ४० हजार वाहनधारकांनी तीन हजार रुपयांचा वार्षिक पास खरेदी केला. तर राज्यातही वार्षिक पासाला चांगला प्रतिसाद मिळत असून सुमारे ६,५३५ वाहनांना हा घेण्यात आला.

द्रुतगती महामार्गावरील पथकर नाक्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि अतिजलद करण्यासाठी फास्टॅग वार्षिक पास योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. एनएचएआयच्या संकेतस्थळावर किंवा ॲपवरून वाहनधारकांना तीन हजार रुपयांचा वार्षिक पास खरेदी करता येतो. हा वार्षिक पास एका वर्षासाठी वैध असणार असून या पासद्वारे देशभरातील एनएचएआयच्या महामार्गावरील पथकर नाक्यांवरून २०० फेऱ्या पथकर न भरता करता येणार आहे. हा पास देशभरातील १,१५० पथकर नाक्यांवर वैध ठरणार आहे.

एनएचएआयच्या मुंबई विभागात अर्थात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, अहिल्यानगर आणि नाशिक असे जिल्हे आहेत. मुंबई विभागातील एनएचएआयच्या द्रुतगती महामार्गावरील ४२ पथकर नाक्यांवरून पहिल्या दिवशी (२४ तासांत) ४७२५ वाहनांनी फास्टॅग वार्षिक पासद्वारे प्रवास केल्याची माहिती एनएचएआयच्या मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. तर नागपूर विभागात नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, धाराशीव, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, बीड, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपूर विभागाच्या एनएचएआयच्या अखत्यारीतील ५४ पथकर नाक्यांवरून पहिल्या दिवशी (२४ तासांत) १,८१० वाहनांनी फास्टॅग वार्षिक पासद्वारे प्रवास केल्याची माहिती एनएचएआयच्या नागपूरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.