ऑक्टोबर- २०२०मध्ये मुंबईसह परिसरातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला होता. यानंतर या घटनेला सायबर हल्ला कारणीभूत असल्याची चर्चाही झाली होती. आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा या चर्चेला नवीन कारण मिळाले आहे.

नागपुरातील पोलीस महासंचालक शिबीर कार्यालयाच्या रविवारी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख एकाच मंचावर होते. या कार्यक्रमात गृहमंत्र्यांनी ‘मध्यंतरी विजेचा ब्रेकडाऊन कशामुळे झाला, हे एकदा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना खासगीत विचारा’ असे वक्तव्य केले.

गृहमंत्री म्हणाले, मध्यंतरी हा ब्रेकडाऊन झाल्यावर आमच्या सायबर तज्ज्ञांकडून विविध स्तरावर चौकशी करण्यात आली. या तपासात अनेक नवीन बाबी कळल्या. त्याची माहिती आम्ही ऊर्जा खात्यालाही दिली. परंतु या बाबत मी बोलणार नाही. हवे असल्यास  तुम्ही खासगीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांना विचारा, असा सल्ला गृहमंत्र्यांनी दिला. गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून मुंबई परिसरातील विजेचा ‘ब्रेकडाऊन’ सायबर हल्ल्यामुळे तर झाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या ब्रेकडाऊनमुळे मुंबईतील मध्य व पश्चिम मार्गावरील लोकल सेवाही ठप्प पडली होती. बऱ्याच उद्योगांनाही या त्याचा फटका बसला होता.

९०० कोटींचा प्रकल्प.. : हल्ली कुणाच्याही खात्यातून चुकीच्या पद्धतीने पैसे लुबाडून सामान्यांची लूट करणे, फेसबुक, ट्विटरवर महिलांसह इतरांचे चित्र-विचित्र फोटो टाकून त्यांना धमकावण्याचे  गुन्हे वाढत आहेत. या गुन्ह्य़ावर नियंत्रणासाठी सुमारे ९०० कोटींच्या सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टवर काम सुरू आहे. करोनामुळे मध्यंतरी या प्रकल्पाचे काम संथ झाले होते. परंतु आता व्यवहार सुरू झाल्याने सरकारची स्थिती हळूहळू रुळावर येत असल्याने पुन्हा या प्रकल्पाला गती देणार असल्याचेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.