नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून चित्रविचित्र घटना घडत आहेत. एरव्ही उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा सारख्या राज्यांमध्ये प्रेम प्रकरणातून जीव जाई पर्यंत होणारी मारहाण नवीन नाही. मात्र राज्याची उपराजधानी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरही आता त्याच दिशेने वाटचाल करीत गुन्हेगारांचीही उपराजधानी बनत चालली आहे. शहरात रोज गुंडगुरी, हाणामाऱ्या, शस्त्र बाळगणे, विनापरवाना पिस्तूल घेऊन फिरणे, लूटपाट, चोरीच्या घटना थांबायला तयार नसताना आता त्यात अपहरणाच्या घटनेनेही भर घातली आहे. त्यामुळे राज्याची उपराजधीचा बिहार होतोय का असे विचारण्याची वेळ गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आणली आहे.
मुलीवर प्रेम केले म्हणून संतापलेल्या एका कुटुंबाने चक्क तरुणाला बळजबरीने एका गाडीत कोंबून निर्जन स्थळी नेत हाणामारी करून सोडून दिल्याचा प्रकार जरीपटका येथे घडला. मुलीच्या प्रेमाची चाहूल लागल्यापासून या कुटुंबाचा त्याला विरोध होता. मात्र आपली मुलगी ऐकत नसल्याने त्यांनी आर्यन खोब्रागडे नावाच्या तरुणाला जबरदस्तीने गाडी बसवून आधी निर्जन स्थळी नेले. तिथे मारहाण करीत त्याला दुसऱ्या जागी सोडून दिले.
आर्यन हा पिण्याच्या पाण्याची बाटली पुरविण्याचे काम करतो. त्याचे चार वर्षांपासून या भागातील एका मुलीसोबत प्रेम होते. याची कुणकूण लागल्यापासून कुटुंबाचा या प्रेमाला विरोध होता. त्यावरून मुलीचे वडील बबलू, भाऊ आणि त्याच्या तीन मित्रांनी आधी आर्यनला बळजबरीने गाडीत बसवून निर्जन स्थळी नेले. या पाच जणांनी आर्यनला मारहाण केली. तेथून पुन्हा आर्यनला एका निर्जनस्थळी सोडून दिले. त्यांनी आर्यनला पुन्हा मुलीशी संपर्क न साधण्याची धमकीही दिली.
झालेल्या प्रकारानंतर मित्राच्या मोबाईलवर संपर्क साधून आर्यन कसाबसा नागपूरात आला आणि तडक जरीपटका पोलिस ठाण्यात पोचला. त्याने घडलेली हकीगत पोलीसांना कथन केली. आर्यनच्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस अलर्ट मोडवर आले. त्यांनी तडक मुलीच्या वडिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातला तीन जणांना अटक केली. मुलीचे वडील बबलू यांचा या प्रेमाला आधीपासूनच विरोध होता, असे पोलीस सुत्रांनी स्पष्ट केले.