लोकसत्ता टीम

नागपूर: वसतीगृहासमोर असलेल्या चहाटपरीवर चहा घेण्यासाठी येणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला चहाटपरी चालकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत अश्लील छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. नीलेश पंढरी कळंबे (३५) रा. एमआयडीसी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पीडित तरुणी मुळची गडचिरोली येथील रहिवासी आहे. हिंगणा मार्गावरील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. एमआयडीसी परिसरात ती भाड्याने खोली घेऊन राहते. आरोपी नीलेशची परिसरातच चहाटपरी होती. काही दिवसांपूर्वी त्याने दुकान भाड्याने दिले, मात्र, दररोज त्याचे दुकानात येणे-जाणे होते. तरुणीसुद्धा दररोज त्या दुकानात चहा पिण्यासाठी जात होती. या दरम्यान नीलेशशी तिची मैत्री झाली. त्याने कोणत्याही प्रकारची गरज असल्यास संपर्क करण्यास सांगितले. त्यांचे मोबाईलवरून एकमेकांशी बोलणे सुरू झाले. या दरम्यान नीलेशने तिला प्रेमात अडकवले. नीलेशने पीडितेला लग्नाचे आश्वासन दिले.

हेही वाचा… नागपूर: सातवीच्या विद्यार्थिनीवर युवकाचा बलात्कार

तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या दरम्यान काही अश्लील फोटोही काढले. दरम्यान पीडितेने लग्नासाठी दबाव टाकला असता टाळाटाळ करू लागला. यावरून दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. नीलेशने पीडितेला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत वाच्यता केल्यास अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला.

हेही वाचा… चंद्रपूर : गोसेखुर्दच्या कामावर शॉक लागून कामगाराचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडितेने हिंमत करून एमआयडीसी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून नीलेशला अटक केली.