चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीनंतर एका मंचावर येणे टाळणारे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर २३ सप्टेंबरला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत चंद्रपुरात होणाऱ्या आढावा बैठकीला एकत्र येतील का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वादाची पार्श्वभूमी
लोकसभा निवडणूक, किंबहुना त्या पूर्वीपासून जिल्ह्यात विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे सध्या खासदार धानोरकर यांच्यासोबत असल्याने विजय वडेट्टीवार काहीसे एकटे पडले आहेत. मात्र, ते मुरब्बी राजकारणी असून ही परिस्थिती कशी हाताळायची, याची कल्पना त्यांना आहे. त्यामुळे कुठलेही वादग्रस्त वक्तव्य न करता किंवा पक्षविरोधी भूमिका न घेता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ सोडून राज्यात सर्वत्र त्यांचे दौरे सुरू आहेत.
हेही वाचा >>>Bachchu Kadu : “अजित पवार गटाचे अर्धाहून अधिक आमदार…”; प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा मोठा दावा!
वडेट्टीवार यांना पराभूत करण्याचे धानोरकर यांचे अप्रत्यक्ष आव्हान
खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासह लगतच्या गडचिरोली लोकसभा मतदारसंघातही पक्षीय कार्यक्रमांबरोबरच कुणबी समाजाचे मेळावे, महाअधिवेशनाला हजेरी लावत आहेत. ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याक लोकप्रतिनिधी नको, पक्ष कुठलाही असो केवळ कुणबी उमेदवार निवडून आणा, असे आवाहन करीत त्यांनी अप्रत्यक्षरित्या विजय वडेट्टीवार यांना लक्ष्य केले. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.
लोकसभेनंतर एका मंचावर येणे टाळले
लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात काँग्रेसकडून सत्कार सोहळे व इतरही कार्यक्रम, आंदोलने झालीत. मात्र, या दोन्ही नेत्यांनी एका मंचावर येणे टाळले. आगामी २३ सप्टेंबर रोजी काँग्रेसची चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा आढावा बैठक चंद्रपुरात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे नेते हजर राहणार आहेत.
हेही वाचा >>>स्टेट बोर्डाच्या शाळांमध्येही आता ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम; पुढील शैक्षणिक वर्षापासून…
चेन्नीथलांमुळे वडेट्टीवार धानोरकरांच्या प्रचारात
चेन्नीथला दुसऱ्यांदा चंद्रपुरात येत आहेत. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी ते चंद्रपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवार यांना सोबत आणले होते. विजय वडेट्टीवार यांनीही कार्यकर्त्यांसमोर भाषण करीत प्रतिभा धानोरकर यांना निवडून आणण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर विजय वडेट्टीवार चंद्रपुरातील राजकीय कार्यक्रमात कधीच सहभागी झाले नाही. याउलट खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली.
दिल्लीत पोहोचला वाद
विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद थेट दिल्लीत पोहोचला आहे. पक्षश्रेष्ठींनी या वादाची दखलही घेतली आहे. पक्षश्रेष्ठी या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई घडवून आणण्यात यशस्वी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आतापर्यंत एका मंचावर येणे टाळणारे विजय वडेट्टीवार व खासदार धानोरकर २३ सप्टेंबरच्या आढावा बैठकीत पक्षश्रेष्टींसमोर तरी एकत्र येतील का, आले तर एकमेकांबाबत काय बोलणार, याबाबत काँग्रेसच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे.