नाशिक – वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची विक्री, टोळ्यांची दहशत, सोनसाखळी चोरीच्या घटना, आश्वासने देऊन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी कारभार या प्रश्नांवरून महायुती सरकारच्या विरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे यांच्यावतीेने शुक्रवारी येथे एकत्रितरित्या जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
दोन्ही पक्षांचा एकत्रितपणे निघणारा हा पहिलाच मोर्चा आहे. शहरासह ग्रामीण भागात बैठकांद्वारे त्याची जोरदार तयारी करण्यात आली. भव्यदिव्य मोर्चा काढून मनसे आणि ठाकरे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे.
राजगड कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, ठाकरे गटाचे उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख आदींनी जनआक्रोश मोर्चाची माहिती दिली. यामध्ये सुमारे २५ हजार नागरिक सहभागी होतील, असा दावा केला जात आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता बी.डी. भालेकर मैदानातून मोर्चाला सुरुवात होईल.
मध्यंतरी हनी ट्रॅपचा विषय बराच गाजला. यात आजी-आजी मंत्री, सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा झाली. परंतु, कुठलीही कारवाई झाली नाही. एमडी ड्रग्ज, अमली पदार्थांची सर्रास विक्री, ऑनलाईन जुगार यामुळे तरूणाई उद्ध्वस्त होत आहे. टोळ्यांमुळे गुन्हेगारीत वाढ झाली. महिलाही सुरक्षित नसून सोनसाखळी चोरी, वाहनांची तोडफोड, छेडछाड, अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. परंतु, सत्ताधारी आणि पोलीस यंत्रणा बेफिकीर असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.
सत्ताधाऱ्यांनी शेतकरी वर्गाची फसवणूक केली. विधानसभा निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन दिले गेले. परंतु, आता टाळाटाळ केली जात आहे. महापालिकेत तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. स्मार्ट सिटी, पाणी पुरवठा, रस्त्यांच्या कामात कोट्यवधींचे घोटाळे झाले. जुगार, मद्याचे अवैध धंदे, सावकारी प्रशासनाच्या आशीर्वादाने चालते. स्मार्ट मीटर बसवून नागरिकांवर जादा वीज देयकांचा भार टाकला जात आहे. डिजिटल फसवणुकीत नागरिकांची कोट्यवधींची लूट झाली. नवीन उद्योग व्यवसायाअभावी बेरोजगारी वाढली आहे. आगामी कुंभमेळ्यातील कामात बाहेरील कंत्राटदारांना प्राधान्य देऊन स्थानिकांना वंचित ठेवल्याचा आरोप करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या मोर्चाद्वारे मनसे व ठाकरे गटाने मतपेरणीची तयारी केली आहे.