नाशिक – शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात २४ ऑक्टोबर रोजी श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात येणार आहे. या बोधी वृक्षारोपणाच्या महोत्सवासाठी देश, विदेशातून उपासक येणार आहेत. यात धर्मगुरू दलाई लामा, श्रीलंकेचे पंतप्रधान, कंबोडियाचे राष्ट्राध्यक्ष आदींचा समावेश आहे. त्यांच्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा व सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोरपणे नियोजन करावे, अशी सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली.

भुजबळ फार्म येथे बोधी वृक्षारोपण महोत्सव नियोजनाची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बोधीवृक्षाच्या फांदी रोपण महोत्सवाचे शहरात महिनाभरासाठी आयोजन करण्यात येणार असून या महोत्सवासाठी दलाई लामा तसेच श्रीलंकेचे पंतप्रधान, कंबोडियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यासह थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जपान, तैवान, व्हिएतनाम या देशातील भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सुरक्षा व्यवस्थेवर भर देण्यात यावा तसेच ऐतिहासिक महत्व असणाऱ्या बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण झाल्यावर त्या फांदीच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी तेथे पोलीस चौकी कार्यान्वित करावी, असे भुजबळ यांनी सूचित केले.

हेही वाचा – नाशिक : धनगर समाजाला आदिवासी आरक्षणाचा लाभ देण्यास विरोध, बोरगावात रास्ता रोको

महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाच्या जागेचे सपाटीकरण करावे. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा व महानगरपालिका तसेच या कार्यक्रमाचे आयोजक शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या समन्वयाने कार्यक्रमाची नियोजन समिती तयार करावी. बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण ज्या ठिकाणी करण्यात येणार आहे, तेथील मातीचे तज्ज्ञांमार्फत परीक्षण करून घ्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

हेही वाचा – नाशिक : श्रमदानासह छायाचित्र काढण्याचीही लगबग, स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा उत्साह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साधारणत: २५०० वर्षांपूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी निरंजना नदीच्या काठावर बोधी वृक्षाखाली ध्यान केले होते. बोधीवृक्ष अतिपूजनीय असून या वृक्षाच्या एका फांदीचे रोपण नाशिक शहरात होत असल्याने आपल्या जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्व अजून वाढणार आहे. या अनुषंगाने बोधी वृक्षारोपणाच्या महोत्सवाचे महत्व लक्षात घेऊन त्या दृष्टीने बुद्धस्मारक परिसरात वाहन व्यवस्था, विविध ठिकाणांहून येणाऱ्या बौद्ध उपासकांची निवास, भोजन, सुरक्षा व्यवस्था व इतर आवश्यक सोयी-सुविधांचे नियोजन २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याची सूचनाही भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना केली.