ताओ तेह किंगमध्ये लाओत्झु म्हणतात : ‘‘फारसं काही केलं नाही तर माणसाकडे विपुल ऊर्जेचा साठा असतो. जगात आपणच पहिले, असं गृहीत धरलं नाही, तर माणसाला प्रतिभेचा विकास करून ती परिपक्व होऊ  देणं शक्य होतं.’’

ओशो हे स्पष्ट करून सांगतात : तुम्ही जेव्हा काही करत नसता, तेव्हा ऊर्जेचा एक साठा होऊन जाता, एक मोठं सरोवर, ऊर्जेने भरलेलं; आणि या सरोवराचा आरसा होतो. या आरशात संपूर्णाची प्रतिमा दिसते आणि प्रतिबिंबही.

सामान्यपणे तुम्ही कर्ते असता- म्हणजे सगळेच कर्ते असतात- तेव्हा तुम्ही कायम वैफल्याने ग्रासलेले असता, कायम तुमची ऊर्जा कमी पडत असते, गरजेपेक्षा कमीच पडत असते. तुम्हाला कायम उदास, अशक्त वाटत राहतं; तुम्ही कधीच चैतन्याने भरलेले आणि उत्साही नसता. तुमच्यात अगदी ओसंडून वाहण्याइतकी ऊर्जा आहे असं क्वचितच होतं आणि जेव्हा एवढी ऊर्जा असते तेव्हा तुम्ही लगेच काही तरी काम सुरू करून तिचा नाश करून टाकता, ती उधळून टाकता. आणि मग तुम्हाला कायम वाटत राहतं की तुम्ही शोषले जात आहात. याला जबाबदार दुसरं कोणीच नाही.

कर्त्यांला ऊर्जेची कमतरता नेहमीच भासत राहणार. आणि अशी खालावलेली ऊर्जा घेऊन तुम्ही अंतापर्यंत पोहोचणार कसे? ऊर्जेचं नेहमी जतन केलं पाहिजे. या ऊर्जेचं खोल तळं तुमच्यात तयार झालं पाहिजे. या तळ्यात तुम्ही संपूर्णाचं प्रतिबिंब बघू शकता.

जर तुम्ही स्पर्धा करत राहिलात, कायम जगात पहिले येण्याचा प्रयत्न करत राहिलात, तर तुमचं स्वत्वच हरवून जाईल. कारण, तुम्हाला वाढण्यासाठी, परिपक्व होण्यासाठी वेळच उरणार नाही. तुमच्यात स्पर्धेची भावना आणि महत्त्वाकांक्षा नसेल, तर तुमच्याजवळ तुमची संपूर्ण ऊर्जा असेल वाढण्यासाठी, परिपक्व होण्यासाठी, फुलण्यासाठी; नाही अन्यथा ही संपूर्ण ऊर्जा किती तरी दिशांना जात राहील. कोणी तरी छान गाडी घेतली. तुम्हाला हे सहन होत नाही. तुमच्या शेजाऱ्याहून चांगली गाडी तुमच्याकडे आलीच पाहिजे, मग या जास्त चांगल्या गाडीवर गेली वाया तुमच्यातली ऊर्जा. तेवढय़ात कोणी तरी तुमच्यापेक्षा चांगला बंगला बांधला. आता तुम्ही त्याच्याहून चांगला बंगला बांधलाच पाहिजे, कारण तो सामान्य शेजारी तुम्हाला हरवू कसा शकतो? सगळं आयुष्य वाया जातं असं. आणि शेवटी तुम्हाला कळतं की शेजाऱ्याशी स्पर्धा करणं म्हणजे आत्महत्या होती. लक्षात ठेवा, तुम्ही इथे आलात ते तुम्ही स्वत: म्हणून जगायला. तुम्ही जगात एकटेच आहात, असं जगलं पाहिजे. तुमच्या शेजारी कोणी नाहीच असं समजून या जगात जगा; शेजारी वगैरे कुणी नाही- फक्त तुम्ही एकटे. आणि मग तुम्हाला आपला मार्ग निवडता येतो. तिथे कोणतीही स्पर्धा नसते. तिथे फक्त आतून होणारी वाढ असते, परिपक्वता असते.

आणि तुम्ही जे कोणी असता सुरुवातीपासून, ते होता. परिपूर्ती केवळ त्यातच आहे. तुम्ही दुसरं कोणी तरी होऊ  शकता पण त्यात परिपूर्ती नाही. तुम्ही रॉकफेलर होऊ  शकता, फोर्ड होऊ  शकता, कोणीही होऊ  शकता; पण तुम्ही हे साध्य करता तेव्हा कळून चुकतं की हे तुमचं प्राक्तन नव्हतंच. तुम्ही दुसऱ्याच कोणाचं तरी प्राक्तन साध्य केलंय- ते तुम्हाला पूर्णत्व कसं देणार? तुमचं प्राक्तन काही तरी छोटंसं असेल, अगदी साधं- म्हणजे तुम्ही एक बासरीवादक होणार असं.

आणि झालात कुठलेतरी अध्यक्ष. आता याचं काय करायचं? आयुष्य तर सगळं वाया गेलं. आणि आता तुम्ही बासरी वाजवत बसलात, तर लोक म्हणतील हा निव्वळ मूर्खपणा आहे. आणि तुम्ही इतके गोंधळून जाल की काहीच कळणार नाही. दिशेच्या सगळ्या जाणिवाच हरवून जातील. लक्षात ठेवा, तुम्ही इथे आला आहात, ते केवळ तुम्ही स्वत: होण्यासाठी. दुसऱ्या कोणासाठी नव्हे, तुम्ही इथे आला आहात ते दुसऱ्या कोणाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नव्हे आणि इथे कोणीही तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आलेलं नाही. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे, पवित्र आहे, दैवी आहे. आणि प्रत्येकाला स्वत:चं असं प्राक्तन आहे. त्याने स्वत:च्या प्राक्तनाला पूर्णत्व दिलं पाहिजे. त्याच्या स्वत:च्या प्राक्तनाची परिपूर्ती झाली की तो संपूर्णाची परिपूर्तीही साध्य करतो. ही परिपूर्ती झाली नाही, तर तो संपूर्णाच्या हृदयातल्या जखमेसारखा होऊन जातो. मला विचाराल तर जगात एकच पाप आहे आणि ते म्हणजे स्वत:च्या प्राक्तनाची पूर्तता न करणं. आणि जगात एकच सदाचार आहे, तो म्हणजे आपण जे होणार आहोत, ते होणं, कोणाची स्पर्धा न करता.

कल्पना करा की, सगळं जग, मानवजात नाहीशी झाली आहे आणि तुम्ही एकटेच उरला आहात पृथ्वीवर- आता तुम्ही काय कराल?  काही वेळ नुसते डोळे मिटून विचार करा, तुम्ही काय कराल? तुमच्या मनात आलं की तुम्ही नृत्य कराल, तर ते तुमचं प्राक्तन. नृत्य करणं! किंवा तुमच्या मनात आलं की तुम्ही नुसतं झाडाखाली आरामात बसाल आणि झोपी जाल- तर झाडाखाली जा आणि झोपा! तेच तुमचं प्राक्तन. केवळ तुमचा एकटय़ाचा विचार करा,  आणि तुम्ही खरोखर एकटेच आहात, मग तुम्हाला पूर्णत्वाची भावना येईल.

तुमच्या स्वत्वाशी सुसंगत असल्या, तर अगदी छोटय़ा गोष्टीही परिपूर्णतेची भावना देतात. तुमच्या स्वत्वाशी सुसंगत नसतील, तर महान गोष्टीही परिपूर्णतेची भावना देऊ  शकत नाहीत.

ताओ, द थ्री ट्रेझर्स या लेखाचा सारांश/ओशो टाइम्स इंटरनॅशनल/ सौजन्य ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन/ www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे