बोईसर : पालघर जिल्ह्यात मान्सून हंगामातील सुरुवातीच्या जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. चांगल्या पावसामुळे भाताच्या रोपांची जोमदार वाढ झाली असून पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या दमदार पावसाने धरणांमध्ये देखील समाधानकारक पाणीसाठा तयार झाला आहे.पालघर जिल्ह्यात जून महिन्यात एकूण ५७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी तलासरी तालुक्यात सर्वाधिक ७४७.८ मिलिमीटर तर मोखाडा तालुक्यात सर्वात कमी ४३०.६ मिलिमीटर पाऊस झाला. २०२४ मध्ये जून महिन्यात ३६७.१ मिलिमीटर पाऊस झाला होता.
जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी ४११.९ मिलिमीटर पाऊस होतो त्या तुलनेत यावर्षी ५७५ मिलिमीटर म्हणजे सरासरी पेक्षा अधिक १३९.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण महिन्यात अतिमुसळधार पाऊस न होता सातत्यपूर्ण पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात देखील समाधानाची भावना असून पेरणी केलेल्या भाताच्या रोपांची जोमदार वाढ झाल्याचे दिसून येते. उत्तम पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांकडून हळव्या जातीच्या भात लावणीला सुरुवात करण्यात आली आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक आठवड्यात सातत्यपूर्ण पाऊस होत असून वसई ५१९ मिली (८८ टक्के), वाडा ५७० मिली (१२५ टक्के), डहाणू ६६० मिली (१४९ टक्के), पालघर ५७३ मिली (११४ टक्के), जव्हार ५३६ मिली (१२५ टक्के), मोखाडा ४३४ मिली (११९ टक्के), तलासरी ७४७ मिली (१९१ टक्के) आणि विक्रमगड ५५७ मिली (११० टक्के) अशाप्रकारे तालुकानिहाय सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
जून महिन्यात झालेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणे आणि लघुपाटबंधारे प्रकल्प देखील वेगाने भरत आहेत. सूर्या प्रकल्पांतर्गत २७६ दलघमी क्षमतेच्या धामणी धरणात १८९ दलघमी (६५ टक्के) पाणीसाठा तयार झाला आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या जव्हार तालुक्यातील डोंगराळ भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरणामध्ये वेगाने पाणीसाठा तयार होत आहे. धामणी धरणाच्या खालील बाजूस असलेला कवडास उन्नेयी बंधारा ४४ टक्के भरले असून वांद्री मध्यम प्रकल्पामध्ये २५ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे.