अकोला : महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे त्रांगडे कायम आहे. काही जागांवरून शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसमध्ये ओढाताण सुरू असून त्यात पश्चिम विदर्भातील मतदारसंघांचा समावेश असल्याची माहिती आहे. मविआतील जागा वाटपावर राजकीय समीकरण ठरणार असून अकोला जिल्ह्यातील पाचपैकी कुणाच्या वाट्याला किती जागा येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. मात्र, अद्याप मविआ व महायुतीमधील जागा वाटपाचे चित्र अस्पष्ट आहे. २०१९ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी होती. आता त्यात शिवसेना ठाकरे गट हा प्रमुख मित्र पक्ष जोडल्या गेला. अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी बाळापूरमध्ये ठाकरे गटाचे नितीन देशमुख विद्यमान आमदार असल्याने ही जागा शिवसेनेसाठी सुटणार असल्याचे निश्चित आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मूर्तिजापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी पवार गटातील इच्छुकांनी तयारी सुरू केली. २०१९ मध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच असल्याने यावेळेस देखील त्यांच्यासाठीच सुटण्याची दाट शक्यता आहे. अकोला पूर्व, अकोट व अकोला पश्चिमसाठी काँग्रेस व शिवसेनेत रस्सीखेच आहे. आघाडीमध्ये या तिन्ही मतदारसंघातून आतापर्यंत काँग्रेस लढत आली. गेल्या निवडणुकीत अकोला पश्चिममध्ये काँग्रेसने भाजपला काट्याची लढत दिली होती. त्यामुळे आताही अकोला पश्चिमवर काँग्रेसचा प्रबळ दावा असून पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी आहे.

हेही वाचा : Akhilesh Yadav : ‘मविआ’चे जागावाटप जाहीर होण्याआधीच ‘सपा’चे ५ उमेदवार जाहीर, आणखी ७ जागांची मागणी; अखिलेश यादवांकडून दबावाचं राजकारण?

अकोला पूर्व व अकोटवरून शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसमध्ये वाद आहे. या दोन्ही मतदारसंघात गेल्या अनेक निवडणुकांपासून काँग्रेस निवडून येऊ शकली नाही. त्यामुळे हे मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्याची मागणी केली जात आहे. अकोटमध्ये काँग्रेसकडून महेश गणगणे, डॉ. संजिवनी बिहाडे, प्रशांत पाचडे, गजानन काकड आदी, तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार संजय गावंडे, जिल्हा संघटक विजय दुतोंडे, शिवा मोहोड, माया म्हैसने आदींचा इच्छुकांमध्ये समावेश आहे. राष्ट्रवादी पवार गटाकडून लढण्यासाठी देखील दोन मोठे नेते उत्सुक आहेत. अकोला पूर्व मतदारसंघात परंपरागतरित्या काँग्रेस व शिवसेना दोन्ही पक्ष लढत आले. काँग्रेसला येथून कायम मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने अकोला पूर्ववर दावा केला. काँग्रेस देखील हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर येथून तयारी करीत असून काँग्रेसकडून डॉ.सुभाष कोरपे, अविनाश देशमुख, पूजा काळे आदी इच्छूक आहेत. अकोला जिल्ह्यात काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट प्रत्येकी दोन, तर राष्ट्रवादी पवार गट एका मतदारसंघातून लढण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : रविकांत तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत जाण्यास अनुकूल

उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये येण्याची तयारी

अकोला पूर्व मतदारसंघ काँग्रेसकडे कायम राहून तेथून उमेदवारी मिळत असल्यास काही इच्छूक पक्षप्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात त्यांची पक्ष नेतृत्वाशी चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

जागा वाटपाची चर्चा वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. जिल्ह्यातील अकोला पश्चिम व अकोट मतदारसंघातून काँग्रेस लढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात वरिष्ठ नेतृत्व निर्णय घेतील. – अशोक अमानकर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना ठाकरे गटाने जिल्ह्यातील बाळापूरसह अकोला पूर्व व अकोट मतदारसंघावर दावा केला. काँग्रेसने हे मतदारसंघ सोडण्याचे मान्य केले होते. वरिष्ठांकडून यासंदर्भात बोलणी सुरू आहे. – गोपाल दातकर, जिल्हा प्रमुख, शिवसेना ठाकरे गट.