पुणे : राज्यात अवयवदानात पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षी ७० मेंदुमृत व्यक्तींचे अवयवदान झाले असून, त्यातून प्राप्त झालेल्या अवयवांमुळे १८१ जणांना जीवदान मिळाले आहे. शहरातील सरकारीसह खासगी रुग्णालयांत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांत वाढ होताना दिसून येत आहे.

पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीने (झेडटीसीसी) २००४ मध्ये केवळ एका मेंदुमृत व्यक्तीच्या अवयवदानापासून सुरुवात केली होती. गेल्या २० वर्षांत ही संख्या वाढत जाऊन ७० वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी पुणे विभागात ७० मेंदुमृत व्यक्तींचे अवयवदान करण्यात आले. त्यातून १८१ जणांना अवयव प्राप्त झाले. त्यात सर्वाधिक ९३ जणांना मूत्रपिंडे प्रत्यारोपित करण्यात आली आहेत. त्या खालोखाल ५८ जणांना यकृत, ६ जणांना हृदय, मूत्रपिंड व स्वादुपिंड ४ जणांना, हृदय व फुफ्फुस एकाला आणि फुफ्फुस १४ जणांना प्रत्यारोपित करण्यात आले, अशी माहिती पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने दिली आहे.

आणखी वाचा-वैमनस्यातून तिघांवर कोयत्याने वार, कासेवाडीतील घटना; सराइतांविरुद्ध गुन्हा

राज्यात गेल्या वर्षी पुणे विभागात सर्वाधिक ७० मेंदुमृत व्यक्तींचे अवयवदान झाले. त्यानंतर मुंबई विभागात ६०, नागपूर विभागात ३६, छत्रपती संभाजीनगर विभागात ३ मेंदुमृत व्यक्तींचे अवयवदान झाले आहे. पुणे विभागीय प्रत्यारोपण समितीची सुरुवात २००४ मध्ये झाल्यापासून आतापर्यंत २० वर्षांत ५५७ मेंदुमृत व्यक्तींचे अवयवदान झाले. त्यातून १ हजार ३५५ रुग्णांना अवयव मिळाले आहेत. पुणे विभागात प्रत्यारोपणासाठी अवयव जलद पोहोचविण्यासाठी २०२४ च्या अखेरीपर्यंत १७५ ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले, असेही समितीने सांगितले.

पुणे विभागातील गेल्या वर्षीचे अवयवदान

अवयवदान केलेल्या मेंदुमृत व्यक्ती – ७०
एकूण अवयव प्रत्यारोपण – १८१
मूत्रपिंड प्रत्यारोपण – ९३
यकृत प्रत्यारोपण – ५८
हृदय प्रत्यारोपण – ६
मूत्रपिंड व स्वादुपिंड प्रत्यारोपण – ४
हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण – १
फुफ्फुस प्रत्यारोपण – १४

आणखी वाचा-‘एसटी’चा ठावठिकाणा आता ‘क्लिक’वर, कसे आहे महामंडळाचे नियोजन?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवयवांच्या प्रतीक्षेत अनेक जण

गेल्या काही वर्षांपासून जीवनशैलीशी निगडित आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मूत्रपिंड, हृदय, यकृत असे अवयव निकामी होऊन त्यांचे प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता निर्माण होत आहे. त्यामुळे अवयवदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांपासून अवयवदानाविषयी जनजागृती होत असली, तर अवयवदानाचे प्रमाण अद्याप मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत नाही. त्यामुळे अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक जणांचा मृत्यू होत असल्याचे वास्तव आहे.