पुणे: राज्य शासनाने कोरेगाव भीमा येथील १ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या ऐतिहासिक स्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) संस्थेकडे दिले आहे. याबाबत राज्य शासनाच्या १७ डिसेंबर २०२१ रोजी शासन निर्णय प्रसृत करण्यात आला आहे. शासनाच्या आदेशानुसार या कार्यक्रमासाठी प्राप्त निधी खर्च केला आहे. मात्र, काही संघटनांनी बार्टीवर केलेल्या आरोपांत तथ्य नसल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा >>> Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यांच्या उपस्थितीत एकदिवसीय शिबिर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य शासनाच्या निर्णयाद्वारे समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या अभिवादन कार्यक्रमासाठी शासकीय समिती नेमण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार या कार्यक्रमासाठी बार्टीने पाच कोटी ५० लाख रुपये निधी जिल्हा परिषदेचा सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण, पूर्व आणि विद्युत विभाग, पुणे ग्रामीण पोलिस, लोणीकंद पोलीस ठाणे, जिल्हा माहिती अधिकारी पुणे, पीएमपीसह संबंधित विभागांना वर्ग केले. तसेच बार्टीने पुस्तक वितरण, माहिती पुस्तिका, ऐतिहासिक स्तंभ लघु चित्रपट, भोजन आदी नियोजनासाठी खर्च केला आहे. मात्र, काही संघटना अभिवादन दिन कार्यक्रमात बार्टीने घोटाळा केला असा आरोप करत असून त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही, असे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी सांगितले.