पुणे : रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी ही स्थिती असलेल्या आणि नेत्र शस्त्रक्रियेची तातडीने गरज असलेल्या ४५ दिवसांच्या बाळाची दृष्टी वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. अमरावतीमधील जिल्हा स्त्री रुग्णालयाचे प्रशासन व कर्मचारी आणि पुण्यातील एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या तत्परतेमुळे या आदिवासी पाड्यावरील बाळावर वेळेत उपचार शक्य झाले.
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील विशेष नवजात बालक चिकित्सा विभागात ४५ दिवसांपासून या बालिकेवर उपचार सुरू होते. तिचे वजन ९९० ग्रॅम होते. तिची रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटीसाठी १२ जूनला चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे बाळाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी धावपळ सुरू झाली. कारण ही शस्त्रक्रिया २ ते ३ दिवसांत होणे गरजेचे होते. बाळाचे पालक (टेमरू, ता. चिखलदरा, जिल्हा अमरावती) आदिवासी समुदायातील असल्याने त्यांची भाषा इतरांना कळत नव्हती. त्यांची आर्थिक परिस्थितीही हलाखीची होती. याचबरोबर सरकारी योजनांमध्ये पात्र ठरण्यायोग्य कागदपत्रेही त्यांच्याकडे नव्हती.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अमरावती स्त्री जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीती इंगळे यांनी तातडीने पुण्यातील एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालिका डॉ. सुचेता कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बाळावर मोफत उपचार शक्य होतील का, अशी विचारणा केली. त्यावर डॉ. कुलकर्णी यांनी तत्काळ होकार देत बाळाला तातडीने पुण्याला पाठविण्यास सांगितले. मात्र, पालकांकडे प्रवासाचे तिकीट काढण्यासाठीही पैसे नव्हते. अखेर मेळघाटातील वरिष्ठ अधिकारी डॉ. तिलोत्तमा वानखेडे व काटकुंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. ऐश्वर्या वानखेडे यांनी ताबडतोब पैशाची मदत करत ५ हजार रुपये डिजिटल माध्यमातून पाठविले.
अखेर १३ जूनला तिकीट काढून बाळासह तिच्या पालकांना रेल्वेत बसवून देण्यात आले. ते १४ जूनला सकाळी ७ वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचले. तिथे एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी रिक्षाची व्यवस्था केली. रुग्णालयात पोहोचल्यानंतर काही वेळातच बाळावर शस्त्रक्रिया सुरू झाली आणि ती यशस्वी झाली. त्याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता बाळासह तिच्या पालकांना पुन्हा रेल्वेत बसवून अमरावतीला पाठविण्यात आले. सध्या बाळावर अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चांगली आहे.
रेटिनोपॅथी ऑफ प्री-मॅच्युरिटी म्हणजे काय?
रेटिनोपॅथी ऑफ प्री-मॅच्युरिटी ही मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांच्या डोळ्यांची एक गंभीर स्थिती आहे. याचे लवकर निदान न झाल्यास कायमचे अंधत्व येऊ शकते. ही स्थिती ३४ आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या आणि २ हजार ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या नवजात शिशूंमध्ये दिसून येते. यावर उपचार न घेतल्यास डोळ्याचा पडदा (रेटिना) हा आजूबाजूच्या ऊतींपासून दूर जातो. यामुळे दृष्टिदोष निर्माण होऊ शकतो किंवा अंधत्व येऊ शकते, अशी माहिती डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी दिली.