पुणे : बारामतीमधून निवडणूक लढविण्यात ‘रस’ नसलेल्या अजित पवार यांनी शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे निमंत्रण अजित पवार यांना थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रेत देण्यात आले. त्यावर ‘महायुतीची बैठक होईल. त्यामध्ये कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा मिळतात, यावर चर्चा होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला कोणत्या जागा मिळतात, हे पाहून शिरूरचा निर्णय घेऊ,’ असे सांगत अजित पवार यांनीही शिरूरमधील उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम ठेवला.

‘बारामती मधून मी सात ते आठ वेळा निवडून आला आहे. बारामती मधून निवडणूक लढविण्यास मला आता रस नाही. कार्यकर्त्यांची मागणी असेल आणि संसदीय समितीने निर्णय घेतला तर, बारामतीमधून जय पवार यांचा विचार होऊ शकतो,’ असे वक्तव्य अजित पवार यांनी स्वातंत्रदिनावेळी केले होते. त्यामुळे  अजित पवार कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रेत तालुका अध्यक्ष रवी काळे यांनी केली. या मागणीला उपस्थितांनीही प्रतिसाद दिला. ‘काळे यांना काय म्हणायचे आहे, ते मला समजले आहे. महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळते, हे पाहूनच शिरूर विधानसभेचा निर्णय घेतला जाईल,’ असे सांगत अजित पवार यांनी या मागणीला थेट नकारही दिला नाही आणि सहमतीही दर्शविली नाही. त्यामुळे अजित पवार कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार, याबाबतचा सस्पेन्स कायम राहिला.

हेही वाचा >>>‘अजित पवारांच्या मनात नक्की काय माहिती नाही’; बारामतीमधून न लढण्याच्या अजित पवार यांच्या विधानावर शरद पवार यांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढविणार नसल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढविण्यासंदर्भात अजित पवार यांच्यावर दबाव आहे, असा आरोप पवार यांचे पुतणे, आमदार रोहित पवार यांनी केला होता. अजित पवार इंदापूरमधूनही निवडणूक लढतील, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यातच अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी रविवारी कर्जत-जामखेड मतदारसंघाचा दौरा केला होता. तर दुसरे चिरंजीव पार्थ सोमवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे पवार कुटुंबातील कोण कोणत्या मतदारसंघातून लढणार, याबाबतची उत्सुकता कायम राहिली आहे.