पुणे : संपूर्ण किनारपट्टीसह मुंबई आणि घाटमाथ्यावर शुक्रवारीही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुणे, पालघर, ठाणे, रायगडला शुक्रवारी ‘रेड ॲलर्ट’ देण्यात आला असून, बहुतांश ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील तयार झालेला कमी दाबाचे पट्टा दक्षिणेकडे झुकला आहे. उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओदिशा किनारपट्टी दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुणे, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना रेड ॲलर्ट दिला असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. मुंबई, रत्नागिरी, साताऱ्याला ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबारसह विदर्भाला यलो ॲलर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा >>>पुणे: शेतकऱ्याने बाजारात नेण्यासाठी वाहनात ठेवलेल्या टोमॅटोची ‘अशी’ झाली चोरी

गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मराठवाड्यात हलका तर विदर्भात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा >>>प्रवाशांसाठी खूषखबर! रेल्वे स्थानकावर आता स्वस्तात पोटभर खा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डहाणूत ३०५, महाबळेश्वरात ३१४ मिमीची नोंद

किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी सकाळी साडेआठला संपलेल्या २४ तासांत डहाणूत सर्वाधिक ३०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल हर्णेत १३०.६, सांताक्रुजमध्ये ९९.१, अलिबागमध्ये ९०.७, कुलाब्यात ८४.८, रत्नागिरीत ५७ मिमी पाऊस झाला आहे. महाबळेश्वरमध्ये ३१४.८ मिमी, कोल्हापुरात ३२.९ मिमी, पुण्यात १७ मिमी, साताऱ्यात २३ मिमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात पावसाचा फारसा जोर नव्हता. विदर्भात चंद्रपुरात ३०.८, गडचिरोली २९ आणि नागपुरात ३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.