पुणे : राज्यात साेमवारी सकाळपासून मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या सेवेवरही परिणाम झाला असल्याने पुण्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. अनेक गाड्यांना विलंब झाल्याने रेल्वे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. कर्जत-कल्याण, कसारा-कल्याण आणि कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान जोरदार पावसामुळे रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. याचा फटका पुण्यातील प्रवाशांना बसला.

नागपूरहून पुण्याकडे येणारी विशेष ट्रेन क्रमांक ०१४४० ही गाडी रविवारी सुमारे ४.५ तास उशिराने धावत होती. सकाळी १०.३० वाजता ही गाडी हडपसर येथे पोहोचली. पुणे स्टेशन अवघे ५ किमी अंतरावर असतानाही ही ट्रेन तब्बल दीड तास जागेवरच उभी होती, अशी माहिती प्रवासी अनिकेत जैन यांनी देत समाजमाध्यमावरून नाराजी व्यक्त केली. जवळपास ७०० प्रवासी या गाडीत अडकून पडले होते, असे त्यांनी सांगितले.

इंद्रायणी एक्सप्रेसलादेखील लोणावळा स्थानकात ४० मिनिटांहून अधिक वेळ थांबवण्यात आले, अशी तक्रार प्रवाशांनी केली. ही गाडी सुरुवातीला फक्त १५ मिनिटे उशिराने धावत होती. मात्र, लोणावळ्यावरील थांब्यामुळे ही गाडी पुण्याला तब्बल १ तास उशिराने पोहोचली. पुणे स्थानकावरून पश्चिम बंगालकडे जाणारी गाडी क्रमांक २०८२१ संत्रागाची एक्सप्रेस पनवेलपर्यंत सुमारे सात तास विलंबाने पोहचली. पुढील अंतर वेगात पार करून विलंबाचा कालावधी दोन तासांवर आणण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रेल्वे प्रशासनाने मात्र हवामान परिस्थिती लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने गाड्यांचा वेग कमी करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. मुसळधार पावसामुळे यंत्रणांवर ताण वाढला असून, गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होत आहे. प्रवाशांनी संयम बाळगावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले.

पावसामुळे मध्य रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला आहे. ज्या ठिकाणी अडथळे येत आहेत, त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. अभियांत्रिकी विभागातील कर्मचारी पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी नेमण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी उच्च क्षमतेचे पंप बसवून रेल्वे मार्ग खुले करण्यात येत आहेत. – स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे विभाग, मुंबई.

रेल्वे मंत्र्यांकडे तक्रार

रेल्वे गाड्यांना विलंब झाल्याने प्रवाशांनी समाजमाध्यमाद्वारे नाराजी व्यक्त करत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रारी केल्या. पुणे रेल्वे स्थानकावरून सुरतच्या दिशेने धावणारी गाडी क्रमांक २२१९३ देखील एक तास उशिराने धावली. गाडीतील काही प्रवाशांनी समाजमाध्यमावरून केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांना लक्ष्य केले.