लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन ओडिसा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसटीएफ) पुण्यातून एका संगणक अभियंता तरुणाला अटक केली. संगणक अभियंता तरुण मूळचा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आहे. तो पुण्यातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करत होता.

अभिजित संजय जांबुरे असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला जांबुरने गोपनीय तांत्रिक माहिती, सांकेतिक शब्द (ओटीपी) पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ओडिसा पोलिसांच्या विशेष तपास पथकने त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवून ओदिशा पोलिसांचे पथक भुवनेश्वरला रवाना झाले.

आणखी वाचा-पुण्यात सांडपाण्याचा पुनर्वापर….४ लाख ९० हजार लिटर पाणी वापरले इमारतींच्या बांधकामासाठी

जांबुरे गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठातील पदवीधर आहे. त्याने सांख्यिकी विषयातील पदवी मिळवली आहे. तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील दाेन अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. जांबुरेने तयार केलेले ओटीपींची विक्री त्याने सायबर गुन्हेगारांना केल्याचा संशय आहे. पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांना त्याने समाजमाध्यमातील संदेश सुविधेद्वारे (मेसेंजर) ओटीपी दिले होते. तो समाजमाध्यमातील संपर्क सुविधेद्वारे काही पाकिस्तानी आणि नायजेरियन नागरिकांच्या संपर्कात असल्याचे ओदिशा एसटीएफने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ओदिशा पोलिसांच्या पथकाने यापूर्वी या प्रकरणात चौघांना अटक केली आहे. आरोपी ॲक्टिव्हेट न झालेल्या सीमकार्डची दुसऱ्या व्यक्तीच्या कागदपत्रांचा वापर करुन खरेदी करायचे. ओटीपी तयार करुन डिजिटल वॉलेटला एक ते ३० हजार रुपयांना विक्री करायचे. आरोपींनी अशा पद्धतीने हजारो ओटीपी सायबर गुन्हेगारांना पुरविल्याचा संशय आहे.

आणखी वाचा- पिंपरी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी विजयकुमार खोराटे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानी नागरिक दानिशच्या संपर्कात

आरोपी अभिजित जांबुरे २०१८ पासून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात होता. तो समाजमाध्यमातील संदेश यंत्रणेद्वारे फैसलाबाद खानकी येथील दानिश अलिस सय्यद दानिस अली नक्वी याच्या संपर्कात होता. दानिशने अभिजितला अमेरिकेतील माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करत (फ्री लान्सर) असल्याची बतावणी केली होती. अभिजितने त्याचा ईमेल आणि सांकेतिक शब्द दानिशला दिला होता. दानिश अभिजितच्या सल्ल्यानुसार माहिती-तंज्ञत्रान कंपनीत काम करीत होता. दानिशला मिळणारी रक्कम तो अभिजितच्या भारतातील खात्यात जमा करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.