पुणे : गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोकणात जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे स्थानकावरून दोन साप्ताहिक रेल्वे कोकणच्या दिशेने सोडण्याचे नियोजन केले आहे. पुणे – रत्नागिरी – पुणे या मार्गावर गाड्या धावणार असल्याने भाविकांना दिलासा मिळणार आहे.

गणेशोत्सवात दर वर्षी कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) जादा बस सोडण्यात येणार असल्या, तरी प्रवाशांची संख्या जास्त असते. बहुतांश भाविक खासगी वाहनाचा पर्याय निवडतात. मात्र, रस्ते मार्गांवर असणारी वाहतूक कोंडी, टोल या समस्यांमुळे प्रवास अधिक खर्चिक आणि त्रासदायी होतो.

रेल्वे प्रशासनाकडून दर वर्षी एक अतिरिक्त गाडी सोडण्यात येत असली, तरी आरक्षणही पूर्ण असते. त्यामुळे भाविकांकडून अतिरिक्त गाडी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मध्ये रेल्वे विभागाने पुण्यातून यंदा दोन साप्ताहिक गाड्या सोडण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार वेळापत्रक तयार करण्यात आले असून, मंगळवारपासून (५ ऑगस्ट) ऑनलाईन आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसे आहे वेळापत्रक?

  • गाडी क्रमांक ०१४४७-०१४४८ : पुणे – रत्नागिरी – पुणे (साप्ताहिक) ही विशेष गाडी २३ व ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री १२.२५ मिनिटांनी रत्नागिरीच्या दिशेने निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५० मिनिटांनी रत्नागिरीत पोहोचणार आहे. तर, परतीच्या प्रवासासाठी २४ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबररोजी रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ५ वाजता पुण्याच्या दिशेने निघेल.
  • गाडी क्रमांक ०१४४५-०१४४६ : पुणे – रत्नागिरी – पुणे ही विशेष गाडी २७ ऑगस्ट, ३ आणि १० सप्टेंबर रोजी पुणे स्थानकावरून रात्री १२.२५ मिनिटांनी रत्नागिरीच्या दिशेने धावेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५० मिनिटांनी रत्नागिरीत पोहोचेल. परतीचा प्रवास त्या दिवशीच सायंकाळी पाच वाजता ही गाडी पुण्याच्या दिशेने निघेल.

कोणत्या स्थानकांवर थांबा?

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे – रत्नागिरी साप्ताहिक गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. विशेष गाड्यांच्या एकूण १२ फेऱ्या होणार चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगांव, वीर, करंजवाडी, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली, संगमेश्वर असे थांबे निश्चित करण्यात आले आहे.