प्रदूषणमुक्त प्रवास आणि इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाची विजेवर धावणारी पहिली वातानुकूलित ‘शिवाई’ बस १ जूनपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. पहिली बस पुणे-अहमदनगर मार्गावर धावणार आहे. या गाडीचे भाडे २७० रुपये असल्याची माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते ‘शिवाई’चा लोकार्पण सोहळा पुणे येथे पार पडला आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रीक करण्याचा मानस व्यक्त केला.

 “पुणे ते अहमदनगर ‘शिवाई इलेक्ट्रीक’ बसचे लोकार्पण होत आहे. एसटीचे ७५ व्या वर्षात पदार्पण होत आहे. मधल्या काळात संपामुळे काही अडचणी आल्या होत्या. त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला. आपण मेट्रोसाठी काही लाख कोटी रुपये खर्च करत आहोत. पण एकदा आपण एकत्र बसून ज्या काही बसेस आहेत त्या सगळ्या एकदा इलेक्ट्रीक आणि चकाचक करुन टाकू आणि त्याला लागतील ते पैसे उभे करु. इलेक्ट्रीक बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे सुतोवाच देखील आपण केले आहे. गोरगरिबांची एसटी वर्षानुवर्षे चालत राहावी यासाठी प्रयत्न करुया,” असे अजित पवार म्हणाले.

“मी सुद्धा एसटीने प्रवास केला आहे. कोणीही कुठेही जन्माला आलं तरी एसटी हे सगळ्यांच्या प्रवासाचे वाहन आहे. आमच्या गाडीचे पायलट असतात ते गाडी वेगाने पळवतात. कधी कधी खासगी गाडीत आम्ही बसलो की त्यांचे गाडी क्रमांक येत नाहीत. सरकारी गाडी असल्यामुळे त्यांना कुठला दंड बसत नाही. मी सरकारची बचत करण्यसाठी ती गाडी वापरत होतो. पण आता ठरवलं आहे की खासगी गाडी वापरायची नाही. सरकारमध्ये आहे तोपर्यंत सरकारीच गाडी वापरणार,” असेही अजित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ‘शिवाई’च्या दिवसाला सहा फेऱ्या होतील. एका कंपनीकडून प्रथम ५० ‘शिवाई’ बस घेण्यात येतील. त्यानंतर आणखी १०० ‘शिवाई’ बस येत्या ऑगस्टपर्यंत ताफ्यात समाविष्ट होतील. ५० पैकी दहा बस पुणे-अहमदनगरबरोबरच पुणे ते औरंगाबाद मार्गावर चालवण्याचे नियोजन आहे. याशिवाय १२ बस पुणे-कोल्हापूर, १८ बस पुणे-नाशिक, १० बस पुणे-सोलापूर मार्गावर चालवण्यात येतील. एका चार्जिगमध्ये २५० किलोमीटपर्यंत धावण्याची या बसची क्षमता आहे. या बसची लांबी १२ मीटर असून टू बाय टू आसन व्यवस्था आहे. बसमध्ये एकूण ४३ आसने असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.