तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही सांगत विरोधकांना टोला लगावला. तसंच हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचं सांगत मोदींवर निशाणा साधला होता. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“उद्धव ठाकरे कधी नव्हे ते बाहेर पडले, दीड वर्षानंतर बाहेर पडले.. त्यांनी आता इतरांना उपदेश करण्याचं काही कारण नाही. की माझा हवाई प्रवास नाही माझा जमिनीवरून प्रवास आहे. तुमचा जमिनीवर प्रवास व तुमचे पाय जमिनीवर राहणं, याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि याबद्दल खूप खूप आनंद, की तुमचे पाय सरकार आल्यापासून हवेत गेले आहेत, ते जमिनीवर आहेत तर आम्हाला आनंद आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस व दरेकरांनी काही हवाई प्रवास केलेला नाही.” असं चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

“हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय,” उद्धव ठाकरेंनी साधला मोदींवर निशाणा

तसेच, “पंतप्रधान हे असे एक पद आहे, की ज्यांच्याबाबतीत धोका पत्कारण अवघड असतं. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था त्यांना सूचवते की, अधिकाधिक पाहणी करायची असेल, तर तुम्ही हवाई पाहणी करा आणि हीच परंपरा आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी देखील हेच करत होत्या. त्यामुळे टीका-टिप्पणी करताना काहीतरी इतिहासाचं ज्ञान पाहिजे, की अशा व्यक्ती हवाई पाहणीच करतात.” असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं.

याचबरोबर, “देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर या दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांनी दुसऱ्याच दिवशी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांचा आढावा घेतला. आता त्यांचा प्रवास पूर्ण होत आहे. दोघांनी जमिनीवरून प्रवास केला, हवेतून नाही. त्यांच्या प्रवासानंतर माझा जो प्रवासही तो कोणाला कळणार नाही याचं कारण, ते विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना आढावा घेण्याचे अधिकार आहेत. ते एकूण प्रशासन म्हणून मुख्यमंत्र्याच्या बरोबरीने मानले जातात. माझ्या प्रवासात मी कार्यकर्त्यांना भेटतो, बैठका घेतो. पक्ष म्हणून आपल्याला काय करता येईल, याबाबत माझा समन्वय सुरू आहे. आशिष शेलार व मनिषा चौधरी दोघांनी संपूर्ण ठाणे, पालघर जिल्ह्यातील सगळा कोळी समाजाचा सर्वे केला. त्यांचं सांत्वन केलं, त्यांचा आढावा केला. त्यांच्या बोटी फुटल्या आहेत, त्याची आकडेवारी गोळा केली आणि आजे बहुतेक हे दोघं मुंबईतील कोळीवाड्यात जाणार आहेत. भाजपाचा प्रदेशाध्यक्ष असल्याने मी प्रशासनिक आढावा घेऊ शकत नाही. मी माझ्या कोथरूड मतदारसंघाचा घेऊ शकतो, कारण मी इथला आमदार आहे.” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

… म्हणून मोदी महाराष्ट्रात न येता गुजरातला गेले –
गुजरातला केंद्र सरकारकडून मदत जाहीर करण्यात आल्याने महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांकडून केल्या जात असलेल्या टीका-टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “पंतप्रधान मोदी कोणताही दुजाभा करत नाहीत, सगळ्या एकार्थाने वावड्या असतात, सगळ्या अनावश्यक चर्चा असतात. मी मुंबईत असताना तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र प्रवास ठरला, पण हवामान खात्याने त्यांना प्रामुख्याने हवाई प्रवास करताना अजुनही महाराष्ट्रातील सागरी पट्ट्यात ते सोयीचं नाही अशाप्रकारची सूचना केली. म्हणून ते गुजरातला गेले पण गुजरातमध्ये जाऊन, संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत घोषित केली. केवळ गुजरातसाठी घोषित केली नाही. गोवा, महाराष्ट्र सारख्या राज्यांना सूचना केल्या की तुम्ही ताबडतोब पंचनामे करा, सर्वे करा आणि तुम्ही प्रस्ताव सादर करा, मी मदत देईन. गुजरातसाठी नावाचं वेगळं पॅकेज त्यांनी घोषित केलं नाही. दोन लाख रूपये मृतांच्या नातेवाईकांना संपूर्ण देशभरासाठी त्यांनी घोषित केले. माहिती नाही, हवामान खातं किंवा त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने त्यांना सल्ला दिली की आता परतण्याची वेळ आहे, पण ते येतील सुद्धा पण त्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील सर्व राज्यांना झालेल्या नुकासानीचं निवेदन, प्रस्ताव लगेच सादर करण्यास सांगितलं आहे.” अशी माहिती त्यांनी दिली.