पुणे: शहरात कोयता गँगने दहशत माजविण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी दुचाकीवरुन कोयता घेऊन निघालेल्यांना टिपले आणि त्वरित या घटनेची माहिती अलंकार पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तपास करुन दुचाकीस्वारासह साथीदारांना पकडले. दोघांची चौकशी करण्यात आली. तेव्हा दोघे जण एरंडवणे भागात महापालिकेचे सफाई कामगार असल्याचे उघडकीस आले. दोघे जण झाडे कापण्यासाठी कोयता घेऊन निघाल्याची माहिती चौकशीत मिळाल्याने पोलीसही चक्रावून गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोथरुड भागातील डहाणूकर कॉलनी परिरसरात रामदासजी कळसकर पथ नामफलकासमोर एक लहान झाड वाढल्याने नाव झाकले गेले होते. तेथे वाढलेली झाडी, झुडपे कापून सफाई करावी, अशी तक्रार नागरिकांनी कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालयात नोंदविली. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयातील दोन सफाई कामगारांनी आरोग्य कोठीतून कोयते घेतले. दुचाकीवरुन दोघे जण डहाणूकर कॉलनीकडे निघाले. सफाई कामगारांनी कोयत्याने झाड तोडले. तेथून ते पुन्हा क्षेत्रीय कार्यालायाकडे निघाले.

हेही वाचा… पुणे : रामटेकडी पुलाजवळ एसटीचा ब्रेक फेल, पाच वाहनांना धडक; चार ते पाच नागरिक जखमी

दुचाकीवरील सहप्रवासी सफाई कामगाराने हातात कोयता धरला होता. दुचाकीवरून निघालेल्या एकाच्या हातात कोयता असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले. पोलीस आयुक्त कार्यलयातील नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी चित्रीकरण पडताळले. संबंधित चित्रीकरण त्वरित अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांना पाठविण्यात आले आणि कोयता बाळगणाऱ्यांना पकडा असे सांगण्यात आले. त्यानंतर पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, आशिष राठोड, पोलीस कर्मचारी निशिकांत सावंत यांनी तपास सुरु केला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब दांडेकर व मुकादम वैजीनाथ गायकवाड अलंकार पोलीस ठाण्यात गेले.

सीसीटीव्ही चित्रीकरण त्यांनी पाहिले. दुचाकीवरून कोयता घेऊन जाणारे कोयता गँगमधील गुन्हेगार नाहीत. कोयता बाळगणारे सफाई कामगार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सफाई कामगारांना अलंकार पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. सफाई कामगार घाबरले होते.
कोयते, कुऱ्हाडींचा वापर गवत आणि फांद्या कापण्यासाठी केला जातो. उघड्यावर काेयते आणि कुऱ्हाडी घेऊन फिरू नका. महापालिकेने कोयते आणि कुऱ्हाडींची नोंद ठेवावी. कोयते, कुऱ्हाडी झाकून नेल्यास नागरिकही भीतीपोटी तक्रार देणार नाहीत, असे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांनी सांगितले. कामाची नोंद, तसेच छायाचित्रे काढून ठेवावीत, असे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: With the proof of cctv police caught two people with koyta but those people were cleaning workers of the municipal corporation pune print news rbk 25 dvr
First published on: 22-11-2023 at 09:41 IST