बहुसंख्य करतात म्हणून अल्पसंख्य करणार आणि अल्पसंख्य असूनही ‘ते’ तसे करतात म्हणून बहुसंख्यांस अधिक चेव येणार हे कोठपर्यंत चालणार?

एके काळी ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ असे बिरुद मिरवणाऱ्या पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यंदा ३०-३२ तास  चालली. मुंबईकरांनी यासाठी २८ तास घेतले. म्हणजे निदान या मुद्दय़ावर तरी मुंबईकरांवर पुण्याने मात केली. नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद वगैरे शहरांत इतका नाही पण असाच प्रदीर्घ काळ हा विसर्जन सोहळा सुरू होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी इद-ए-मिलाद उन नबीच्या भव्य मिरवणुका निघाल्या. हा इस्लामचे प्रेषित महंमद पैगंबर यांचा जन्मदिन. तो इद-ए-मिलाद म्हणून साजरा होतो. वास्तविक इस्लामिक संस्कृतीत प्रेषिताचा जन्मदिन साजरा करण्याची प्रथा नाही. कुराण आणि सुन्नाच्या मते तर ईद-उल-फित्र आणि ईद-ए-अद्धा या दोन पवित्र दिनांखेरीज अन्य काही साजरे करण्यास धर्मसांस्कृतिक आधार नाही. म्हणजे जे काही या दिनी अलीकडे होऊ लागले आहे त्याचे वर्णन धार्मिक नावीन्य असे करता येईल. इतकी वर्षे मुंबई वा परिसरात राहणाऱ्यांस या ईद-ए-मिलादच्या प्रचंड मिरवणुका पाहून ‘आता हे काय नवीन’ अशा प्रकारचा प्रश्न पडला असणे शक्य आहे. गणेश विसर्जन आणि पाठोपाठ हा ईद-ए-मिलादचा जश्न यामुळे देशाची आर्थिक राजधानी जवळपास ३६ ते ४८ तास निश्चल होऊन पडली होती. जे मुंबई-पुण्यात होते त्याचे अनुकरण अन्य शहरीही करू लागतात. अलीकडच्या काळात राज्यभरात अनेक ठिकाणी साध्या गणेशाच्या ऐवजी ‘अमुकचा राजा’, ‘तमुकचा महाराजा’ यांचे जे खूळ पसरलेले आहे त्यातून हेच दिसते. हल्ली सतत कोणाशी ना कोणाशी सलगी दाखवणे जणू जीवनावश्यक झालेले आहे. त्याखेरीज स्वत:ची ओळखच अनेकांस राखता येत नाही. त्यामुळे विघ्नहर्ता, सुखकर्ता अशा श्रीगणेशाचे रूपांतर माध्यमांनी फिल्मी लाडीलाडिक ‘बाप्पा’ असे करून टाकलेले आहे. या सगळय़ातून श्रीगणेश ज्याची देवता म्हणून पूजला जातो त्या घटकाची किती सार्वत्रिक कमतरता आहे हेच दिसून येते. असो. त्याविषयी काही भाष्य करणे मूर्खपणाचे ठरावे असा हा काळ. त्यास ‘कालाय तस्मै नम:’ असे म्हणत शरण जावयाचे तरी काही मुद्दे दुर्लक्षित करता येत नाहीत.

ganeshotsav noise pollution pune marathi news,
पुण्यात गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाचाच ‘आव्वाज’! कमाल मर्यादा पातळीचा सर्वत्र भंग; दोनशे मंडळांच्या ठिकाणी तपासणी
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Ganesh idol immersion, Vasai Virar, artificial lake,
वसई विरारमध्ये दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन; कृत्रिम तलावाला नागरिकांचा प्रतिसाद
Reason for immersion of Ganpati on One & Half, Fifth, Sixth and tenth Day
Ganesh Visarjan 2024 : दीड, पाच, सात किंवा दहाव्या दिवशीच का केले जाते गणेशमूर्तीचे विसर्जन? गौरींचे विसर्जन कोणत्या दिवशी होते?
ganeshotsav latest news in marathi
ठाणे: गणेशोत्सवात दिवसा अवजड वाहनांना निर्बंध
price of ganesh idol increased by more then 20% this year
अकोला : गणेशोत्सवावर महागाईचे ‘विघ्न’,मूर्तीच्या किंमतीत २० % वाढ
After 100 years Ganesha Chaturthi will create wonderful yoga
१०० वर्षांनी गणेश चतुर्थीला निर्माण होईल अद्भुत योग, बाप्पाच्या कृपेने ‘हे’ लोक होऊ शकतात कोट्याधीश, आनंदाचे दिवस येणार
Mumbai Municipal Corporation will construct 204 artificial ponds for Ganesh immersion Mumbai news
यंदा गणेश विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव; गेल्या ११ वर्षांत कृत्रिम तलावातील गणेशमूर्ती विसर्जनात ३७१ टक्क्यांनी वाढ

हेही वाचा >>> अग्रलेख : सदा-हरित!

राज्यभरात विसर्जन मिरवणुकीत शेवटची माहिती हाती आली तोपर्यंत (किमान) १९ जणांचे प्राण गेल्याचे दिसते. याखेरीज दोन-पाच जण मिरवणुकीतील स्पीकर्सच्या अभेद्य भिंतींतून येणाऱ्या असह्य आवाज लहरींखाली चिरडून गेले. अलीकडे या मिरवणुकांत आवाजाच्या जोडीने आवाजाइतकेच तीव्र प्रकाशझोत सोडण्याची नवीच प्रथा सुरू झाली आहे. तो टोचता प्रकाश डोळय़ावर आदळून किती जण आंधळे झाले याचा तपशील तूर्त उपलब्ध नाही. म्हणजे हे सण नागरिकांची अवस्था ‘कानाने बहिरा, डोळय़ाने आंधळा, मुका परी नाही’ अशी करणार. पुढील काही दिवसांत कानाच्या डॉक्टरांकडे किती जणांस भेट द्यावी लागली याचा तपशीलही सहज उपलब्ध होणार नाही. भाद्रपदातील या गणेशोत्सवाआधी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शब्दश: काल्यात अर्धा एक डझनांनी प्राण गमावले. काही जन्माचे लंगडे-लुळे झाले. यांना कितीही कौतुकाने दिव्यांग वगैरे म्हटले तरी त्यांच्या आर्थिक आणि शारीरिक वेदना काही कमी होणाऱ्या नाहीत. हे हकनाक प्राणास मुकलेले तरुण म्हणता येतील अशा वर्गातले. कोणा स्थानिक पुढाऱ्याने अ(न)धिकृत मिळकतीतून पुरवलेले विशिष्ट रंगांचे गणवेश, डोईवर फेटे वा तत्सम काही शिरस्त्राणे आणि हातात माधुर्य या संकल्पनेशी दूरान्वयानेही कधी संबंध न आलेली वाद्ये बडवणे वगैरे भांडवल इन्स्टाग्रामी मिरवण्यास पुरेसे असेलही. पण यातून जगण्याचे प्रश्न मिटत नाहीत. या वीरश्रीयुक्त इत्यादी वातावरणात मिरवल्याने काही ‘रील्स’ आणि दोनपाचशे लाइक्स जमा होतील. पण आयुष्यात कमाईच्या रकान्यात काही जमा होण्यासाठी यापेक्षा बरेच काही करावे लागते. याचे भान येण्याआधीच यातील काही काळाच्या उदरात गायब होतात आणि जे राहतात त्यातील बरेच ‘‘..आगे बढो, हम तुम्हारे साथ है’’च्या घोषणांत गळा सुकवण्यात धन्यता मानतात. हे सगळे आपणास समाज म्हणून कोठे नेणार आहे हा प्रश्न या वीररसधुंद वीरांना पडत नसला तरी या समाजाचे बौद्धिक नेतृत्व करणाऱ्यांनाही पडू नये? की असे बौद्धिक नेतृत्व करण्याची क्षमता असलेले आपापले मेंदू सत्ताचरणी ठेवून आनंदाने झोपी गेले?

हेही वाचा >>> अग्रलेख: ‘काँग्रेस’मुक्तीचा आनंद

हा प्रश्न पडतो याचे कारण अलीकडच्या काळात सरकारी आशीर्वादाने सुरू झालेली ही उन्मादस्पर्धा! गणेश विसर्जन मिरवणूक जनतेस दोन दिवस वेठीस धरते, मग ‘ईद’ मिरवणुकांनी एखादा दिवस आणखी गैरसोय वाढवली तर काय बिघडले, या प्रकारे समाजास वेठीस धरण्यासाठी अन्य अनेक धर्मीयांचे प्रेषित वा संस्थापक यांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या आहेतच. एरवी आपली अहिंसकता मिरवणारेही मग कोणी मुनी-महाराजांस रस्त्यांवरून वाजत-गाजत नेताना वाहतुकीचा खोळंबा होतो याची तमा बाळगत नाहीत आणि धर्माविरोधात ज्यांनी बंड केले त्यांच्या जन्मदिनी-जन्मस्थळी ‘तीर्थयात्रा’ भरवणाऱ्यांस आपल्या पूज्य व्यक्तीचे विचार आपण पायदळी तुडवतो याचे भान राहात नाही. यातील काही वा हे सर्व याआधीही होतेच. म्हणजे अमुक एका पक्षाच्या उदयानंतर असले प्रकार सुरू झाले असे नाही. भारतीयतेच्या वैविध्यात याचा अंतर्भाव आधीही होता. तथापि काळाच्या ओघात यात बदल झाला तो इतकाच की या सगळय़ास राजाश्रय मिळू लागला. अलीकडे सत्ताधीश आपले धर्मप्रेम खांद्यावर घेऊन मिरवू लागले. मंडळामंडळास, देवळा-रावळात, बाबा-बापूंच्या पाद्यपूजनास भेट देत गावगन्ना हिंडणारे हे राज्यकर्ते पाहिले की ‘पूजाअर्चेत इतका वेळ व्यतीत करावयाचा असेल तर पेशवाई सोडून हाती पळीपंचपात्री घ्या’ असे माधवराव पेशव्यांस खडसावणारे रामशास्त्री याच प्रांतात कसे काय होऊन गेले याचा अचंबा वाटतो. सत्ताधीशांच्या घरी गणपती दर्शननिमित्ते पायधूळ झाडणाऱ्या, या दर्शनाचे फेसबुकी प्रदर्शन करणाऱ्या तृतीयपर्णीयांची, बुद्धिजीवींची वाढती संख्या पाहून तर उबग यावा अशी परिस्थिती. बरे हे सर्व वैयक्तिकतेच्या परिघात राहते तरी त्याकडे दुर्लक्ष करता आले असते. पण या उन्मादाने आता वैयक्तिकतेचा परीघ ओलांडला असून त्यातून केवळ सामाजिक नव्हे तर समाज ज्यांचा बनतो त्या व्यक्तींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागलेला आहे, हे आपणास केव्हा कळणार? धर्मोत्सवात इतक्या जणांचे प्राण जाणे, या उत्सवांत (?) केवळ कान आणि शरीरच काय पण काँक्रीटच्या भिंतींनाही तडे जातील इतक्या कंपनाच्या असह्य ध्वनिलहरी प्रदीर्घ काळ निर्माण करत राहणे, याच्या जोडीला नवा उच्छाद म्हणजे डोळय़ांसमोर अंधारी आणणारे प्रकाशझोत हे सर्व काय आहे? यात कोणता आहे धर्म आणि हा कसला उत्सव, असे प्रश्न आपणास अद्यापही पडतात काय? ही पृथ्वी, हा आसमंत आपल्या एकटय़ाच्या मालकीचा नाही. त्यावर प्राणी, पक्षी, कीटक, वृक्ष, वेली यांचाही अधिकार आहे आणि आपल्या उत्सवप्रेमाने (?) त्यांच्या अस्तित्वास धक्का लावण्याचा आपणास अधिकार नाही, ही मूलभूत जैवचक्र समज आपणास सोडून गेली आहे काय? बहुसंख्य करतात म्हणून अल्पसंख्य करणार आणि अल्पसंख्य असूनही ‘ते’ तसे करतात म्हणून बहुसंख्यांस अधिक चेव येणार हे कोठपर्यंत चालणार? प्रगतीसाठी आवश्यक आव्हाने पेलण्याची क्षमता अद्याप आपणात नाही, आपले नागरजीवन बकालतेकडे अधिकाधिक वेगाने निघालेले आहे आणि यात सुधारणा करणे हे अधिक महत्त्वाचे आहे, हे कधी लक्षात येणार? हे सर्व वा यातील किमान काही प्रश्न पडत असतील तर समाजधुरीणांनी आता तरी पुढे येऊन सामाजिक ऊर्जेचा हा असा अनुत्पादक वापर थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आलेली आहे. ती साधली नाही गणेशमूर्तीसमवेत सामाजिक विवेकाचेही विसर्जन झाले, असे म्हणावे लागेल. पुढील भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाचे आगमन होईल, पण विसर्जित झालेल्या  विवेकाचे पुनरागमन होईल काय?