डोंबिवली : महापालिकेच्या डोंबिवली विभागातील फ आणि ग प्रभागांचे नागरी सुविधा केंद्र डोंबिवली पूर्वेतील चार रस्त्यावरील जगन्नाथ काॅमर्स प्लाझा इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर सोमवारपासून (ता. ३०) सुरू करण्यात आले. डोंबिवली शहरातील नागरिकांची मालमत्ता कर भरणा, जन्म मृत्यू दाखले मिळण्याची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने हे कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
कल्याण डोंबिवली पालिकेची डोंबिवली पूर्व इंदिरा चौकातील विभागीय कार्यालयाची इमारत दहा वर्षापूर्वी धोकादायक झाली. या इमारतीमधील फ आणि ग प्रभागाची कार्यालये यापूर्वीच अन्यत्र स्थलांततरित करण्यात आली आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने नागरी सुविधा केंद्र या धोकादायक इमारतीत सुरू ठेवले होते. गेल्या पंधरा दिवसाच्या काळात नागरी सुविधा केंद्रातील पीओपीचा स्तर कोसळला. सुदैवाने कोणा कर्मचाऱ्याला दुखापत झाली नाही. हे धोक्याचे इशारे असल्याने प्रशासनाने तातडीने हे सुविधा केंद्र डोंबिवली पूर्वेतील पेंडसनगरमधील गल्ली क्रमांक पाचमधील पालिकच्या एका कार्यालयात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी पालिकेला नव्याने सुविधा केंद्राची उभारणी करावी लागणार होती. तोपर्यंत डोंबिवली नागरी सुविधा केंद्रातील १६ कर्मचारी कल्याण येथील पालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात आले होते.
मालमत्ता कर, पाणी देयक भरणा करण्याचे दिवस सुरू आहेत. जन्म मृत्यू दाखला मिळण्यासाठी नागरिकांची धडपड असते. अशा परिस्थितीत डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील नागरी सुविधा केंद्र बंद झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. नागरी सुविधा केंद्रात कर भरणा करण्यासाठी येणारा वर्ग हा बहुतांशी ज्येष्ठ नागरिक, वृध्द गटातील आहे. त्यामुळे त्यांच्या समोर सुविधा केंद्र बंद झाल्याने प्रश्न निर्माण झाले होते.
पालिकेने हे केंद्र चार रस्त्यावरील जगन्नाथ प्लाझा इमारतीत सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या सर्व प्रक्रियेला वेळ लागणार आहे. तोपर्यंत नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपातील पेंडसेनगरमध्ये जावे लागणार होते. याठिकाणी जाण्यासाठी रिक्षा चालकांकडून होणारी अडवणूक या सर्व गोष्टींचा विचार करून काही जाणकार नागरिकांनी स्थानिक आमदार आणि प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. रेल्वे स्थानकाजवळील केंद्र पेंडसेनगरमध्ये स्थलांतरित झाले तर नागरिकांच्या होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. आमदार चव्हाण यांनी तात्काळ पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला. हे कार्यालय चार रस्त्यावर जगन्नाथ काॅमर्स प्लाझा येथे तात्पुरत्या स्वरुपात सुरू करण्यात यावे. याच जागेत ते कायमस्वरुपी सुरू होईल यासाठीही प्रयत्न करावेत अशी सूचना केली. प्रशासनाने आमदारांच्या सूचनेची दखल घेऊन चार रस्त्यावरील इमारतीत फ आणि ग प्रभागाचे नागरी सुविधा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.
टिळकनगर, नेहरू मैदान परिसर, फडके रस्ता, सुनीलनगर, आयरे, राजाजी रस्ता परिसरातील रहिवाशांना चार रस्ता येथील सुविधा केंद्र मध्यवर्ति ठिकाणी आहे. मध्यवर्ति ठिकाणी हे केंद्र सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.