डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रस्त्यावरील रेल्वे स्थानक भागातील धोकादायक असलेल्या एका झाडाच्या फांद्या रस्त्याच्या दिशेने वाकल्या होत्या. वारा पाऊस आला की या फांद्या कोसळण्याची भीती होती. या धोकादायक स्थितीत असलेल्या झाडाच्या फांद्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यान विभागाच्या कापकाम कामगारांनी छाटून टाकल्या.
घनश्याम गुप्ते हा बाजारपेठेचा भाग आणि रेल्वे स्थानकाजवळील रस्ता आहे. हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्याच्या गोमांतक बेकरी समोरील भागात एक झाड पदपथाच्या आधारे उभे आहे. या झाडाच्या तीन ते चार फांद्या रस्त्याच्या दिशेने वाकल्या होत्या. मुसळधार पाऊस आणि वारा असला की या फांद्या जमिनीच्या दिशेने वाकत होत्या. जोरादार वारा आला तर या फांद्या तुटण्याची शक्यता होती.
या झाडाच्या परिसरात फेरीवाले बसतात. पादचारी, वाहनांची सतत वर्दळ असते. या धोकादायक झाडाविषयी उद्यान विभागाचे डोंबिवलीचे अधीक्षक महेश देशपांडे यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. अधीक्षक देशपांडे यांनी कापकाम मजूर घेऊन तातडीने धोकादायक स्थितीत असलेल्या गुप्ते रस्त्यावरील झाडाच्या फांद्या छाटून टाकल्या.
डोंबिवली पूर्वेत छेडा रस्त्यावर एक नारळाचे झाड रस्त्याच्या दिशेने वाकले आहे. या झाडाच्या झावळ्या अनेक वेळा पादचाऱ्यांच्या अंगावर पडतात. हे झाड तोडून टाकण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून पालिकेकडे करण्यात येत आहे. प्राप्त तक्रारीप्रमाणे अधीक्षक देशपांडे यांनी छेडा रस्त्यावरील नारळाच्या झाडाची पाहणी केली.
हे झाड एका सोसायटीच्या मालकीत येते. या झाडाची पाहणी केल्यानंतर उद्यान अधीक्षक देशपांडे हे झाड छाटण्यासाठी सोसायटी पदाधिकाऱ्यांना एक ना हरकत पत्र देण्याचे कळविले आहे. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर पदपथावरील हे धोकादायक नारळाचे झाड तोडण्यात येणार आहे. दोन वर्षापूर्वी मुंबईत नारळाचे झाड अंगावर कोसळून पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे काही दुर्घटना घडण्यापूर्वीच हे झाड छाटण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.