कल्याण – मागील २५ वर्षापासून चर्चेत असलेला. पर्यावरण विषयावरून रद्द करण्यात आलेल्या ठाणे ते डोंबिवली या रेल्वे समांतर रस्त्याचे पुन्हा सर्वेक्षण करा, असे निर्देश कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी रस्ते बांंधकाम, सर्वेक्षण विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. रस्ते वाहतूक मार्गात सुसुत्रता येण्यासाठी विविध पर्यायी रस्त्यांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त गोयल यांनी दिलेले निर्देश खूप महत्वाचे आहेत. या बैठकीला शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त वंदना गुळवे, उपायुक्त रमेश मिसाळ, परिवहन व्यवस्थापक डाॅ. विजयकुमार द्वासे उपस्थित होते.

कल्याण ग्रामीण आणि रेल्वे प्रवाशांशी संंबंधित विषयावर कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी गुरूवारी कल्याण पालिका मुख्यालयात आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नागरी विकासाचे प्रश्न, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, २७ गावातील पाणी प्रश्न, रेल्वे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास आणि वाढते रेल्वे अपघात या विषयावर एक सविस्तर निवेदन आयुक्त गोयल यांना दिले.

या चर्चेच्यावेळी कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील प्रवाशांना रेल्वेने प्रवास करताना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. कल्याण, डोंबिवली शहर परिसराचे झपाट्याने नागरीकरण झाले आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. रेल्वे मार्गाला पर्याय म्हणून इतर रस्ते मार्ग असले तरी ठाणे ते डोंबिवली हा रेल्वे समांतर रस्ता हाही आता काळाची गरज आहे, असे मत या बैठकीत आमदार राजेश मोरे यांनी आयुक्तांसमोर मांडले.

ठाण्याहून डोंबिवली आणि डोंबिवलीहून थेट ठाण्याला रेल्वे समांतर रस्त्याने जाता आले तर प्रवाशांचा भिवंडी बाह्यवळण रस्ता, शिळफाटा मार्गान जाण्याचा त्रास वाचणार आहे. लोकल गर्दीला पर्याय म्हणून हा रस्ते मार्ग खूप उपयोगाचे असल्याने आयुक्त गोयल यांनी इतका महत्वाचा हा प्रस्तावित रस्ते मार्ग असेल तर त्याचे सर्वेक्षण करा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील वीस वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेचे माजी आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी ठाणे ते डोंबिवली समांतर रस्ता होण्यासाठी राज्य, केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. २६ जुलै २००५ च्या महापुराच्या वेळी शिळफाटा, भिवंडी बाह्यवळण रस्ते पाण्याखाली गेले होते. ठाणे ते डोंबिवली दरम्यानचा रेल्वे मार्गा पाण्याखाली गेला होता. त्यावेळी या रेल्वे समांतर रस्त्याचे महत्व अधोरेखित झाले होते. हा रस्ता मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली असताना पर्यावरण विभागाने या रस्ते मार्गाला हरकत घेतल्याने या रस्ते मार्गाचा प्रस्ताव बारगळला होता. आमदार मोरे यांनी हा रस्ता मार्गी लागण्यासाठी प्रशासनाने सहाकार्य करावे अशी मागणी केली.

या बैठकीला शिवसेना डोंबिवली शहर सचिव संतोष चव्हाण, उपतालुका प्रमुख राहुल गणपुले, उपशहरप्रमुख संजय विचारे, संघर्ष समितीचे दत्ता वझे, गजानन मांगरुळकर उपस्थित होते.