ठाणे : शेतमालाला हमीभाव मिळावा तसेच कर्जमाफी करावी या मागणीसाठी लातुर जवळील अहमदपूर येथील शेतकरी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मागील १२ दिवसांपासून पायी मंत्रालयाच्या दिशेने निघाले होते. मात्र, सोमवारी ठाण्यात पोहचताच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गेल्याकाही महिन्यांपासून शेतकरी आत्महत्याच्या घटना घडत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या विधीमंडळात मांडाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. राज्यातील लातुर जवळील अहमदपूर येथील शेतकऱ्याने थेट पायी मंत्रालय गाठण्याचे ठरविले. त्यानुसार, मागील १२ दिवसांपासून खांद्यावर नांगर घेऊन शेतकरी सहदेव होनाळे हे मंत्रालयाच्या दिशेने निघाले होते. हा विषय सर्वत्र चर्चेचा ठरला होता. महायुतीने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन न पाळल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या आत्महत्या रोखाव्या, या मागणीसाठी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेने पायी निघाले होते.

ठाणे शहरात पोहचल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. ही माहिती मिळताच राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांना शेतकर्याची भेट घेण्याची सुचना केली होती. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकाऱ्यांकडून होनाळे यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश पाटील यांच्या फोनवर व्हिडिओ काॅल करून शेतकरी होनाळे यांची कैफियत ऐकून घेतली. तसेच, हा विषय विधिमंडळात मांडण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना, सुहास देसाई यांनी हे सरकार निगरगट्ट असून आपला बळी राजा रूग्णालयात तडफडत असतानाही एकही माणूस त्याची भेट घेण्यास येत नाही अशी टीका केली. सर्वच शेतकर्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी हा बळीराजा चालत निघालाय. पण, या सरकारला त्याचे सोयरसुतक नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्या होनाळे मंत्रालयाच्या दिशेने निघणार आहेत. आमचा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. या सरकारला आता बळीराजा त्यांची जागा दाखवेल, असेही त्यांनी सांगितले. तर शेतकरी सहदेव होनाळे यांना या प्रसंगी अश्रू अनावर झाले. आपली कुणीच दखल घेतली नव्हती. डाॅ.जितेंद्र आव्हाड, सुहास देसाई, प्रकाश पाटील यांनी आपली कैफियत जाणून घेतली. हा आवाज आता सरकारपर्यंत पोहचावा, अशी विनंती त्यांनी केली.