क्रिकेटमधील भारताचा पारंपारिक स्पर्धक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तान संघासोबत रविवारी आशिया चषकातील भारताचा पहिला सामना रंगला. या सामन्यावर उल्हासनगर शहरात सट्टा खेळणाऱ्या एका सट्टेबाजाला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> गणेश विसर्जन निमित्ताने ठाणे जिल्ह्यात वाहतूक बदल

दोनच दिवसांपूर्वी दुबईमध्ये आशियाई क्रिकेट चषकाच्या सामन्यांना सुरुवात झाली. रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना खेळवला गेला. या सामन्याबद्दल मोठी उत्सुकता होती. पारंपारिक प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध सामना असल्याने या सामन्यावर सट्टा लावला जाईल अशी कुणकुण पोलिसांना होती. त्यामुळे परिमंडळ ४ मधील पोलीस सतर्क होते. सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच उल्हासनगर पोलिसांना कॅम्प दोन भागातील मधुबन चौक परिसरात एका सट्टेबाजाकडून सट्टा लावला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मधुबन चौकातील मुकुंद अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या संजय मंगूमल हरदासानी याला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. संजय हरदासानी भारत विरुद्ध पाकिस्तानच्या टी २० सामन्यावर सट्टा लावत होता. त्याच्याकडे पाच मोबाईल, एक वही त्यात नाव आकडे आणि भारत पाकिस्तान सामन्याचा उल्लेख होता. यावेळी पोलिसांनी एकूण ३३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या सट्टेबाजावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One arrested from uulhasnagar city for betting on india pakistan match amy
First published on: 29-08-2022 at 13:58 IST